खरेदीसाठी दिवसभर झुंबड; अंतरनियमांचा फज्जा,  मुखपट्टी वापराकडे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : करोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या अंशत: टाळेबंदीची अंमलबजावणी आज, मंगळवारपासून होणार असून त्यामध्ये जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत मोठी झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. बाजारपेठेतील कपडय़ांची दुकाने तसेच इतर वस्तूंच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी केली होती. तर भाजी मंडई सुरू राहणार असल्या तरी तिथेही मोठी गर्दी झाली होती. याठिकाणी अनेक जण मुखपट्टीविना वावरत असल्याचे आणि अंतरसोवळ्याच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अंशत: टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी तर, सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. याशिवाय, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने, बाजारपेठा, उपाहारगृहे, खासगी कार्यालये आणि मॉल्स ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या टाळेबंदीची अंमलबजावणी सोमवार रात्रीपासून होणार असून यामुळे मंगळवारपासून शहरात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. यामुळे सोमवारी शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. ठाणे बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. लग्नाच्या खरेदीसाठी अनेकांनी कपडे विक्रीच्या दुकानांत गर्दी केली

होती. अशीच गर्दी इतर साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये दिसून आली. तसेच भाजी मंडई सुरू राहणार असल्या तरी तिथेही सकाळी मोठी गर्दी झाली होती. भाज्यांचे दर येत्या दोन दिवसांत वाढू शकतात. तसेच भाजी मिळेल की नाही, या भीतीने भाजी खरेदीसाठी अनेक नागरिक इथे आले होते. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले काही नागरिक मुखपट्टीविना फिरत होते, तर काही नागरिकांच्या मुखपट्टय़ा तोंडाऐवजी हनुवटीवर होत्या. पोलीस किंवा महापालिकेचे कर्मचारीही या ठिकाणी उपलब्ध नव्हते.

रेल्वे स्थानक, बस थांब्यावर गर्दी

अंशत: टाळेबंदीही लागू झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी पुन्हा गावाच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात केली. हाती काम नसेल तर थांबून उपयोग काय, असे या कामगारांचे म्हणणे होते. त्यामुळे कल्याण एसटी आगार तसेच ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांमध्ये गर्दी झाली होती. एसटीने प्रवास करणारे अनेक जण धुळे, जळगाव, परभणी, औरंगाबाद, लातूर, नाशिक भागांतील होते. तर ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकामध्ये परप्रांतीय मजुरांची गर्दी झाली होती. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश या भागात जाणारे मजूर कुटुंबासह दिसून येत होते. काही जणांकडे तिकिटांचे आरक्षण नव्हते. संपूर्ण फलाटावर परप्रांतीयांच्या रांगा लागल्या होत्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowds in thane city market zws
First published on: 06-04-2021 at 00:08 IST