‘बँक ऑफ महाराष्ट्र’ला ५० हजारांचा दंड

बँकेच्या संगणकांचे सव्‍‌र्हर डाउन असल्याने ग्राहकाला दोन दिवस सातत्याने झालेल्या आर्थिक नुकसानीची दखल घेत ठाणे ग्राहक मंचाने मीरारोड परिसरातील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या व्यवस्थापनाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.

सुंदर श्याम भाटिया हे मीरा रोड येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेतील खातेदार आहेत. बँकेच्या व्यवस्थापनाने त्यांना खात्यावर पाच लाख ४० हजार रुपयांची कॅश क्रेडिट सुविधा दिलेली आहे. ५ जानेवारी २०१५ रोजी भाटिया यांच्या खात्यावर एकूण पाच लाख ६७ हजार रुपयांची रक्कम शिलकीत होती. त्यामुळे भाटिया यांनी दोन लाख ४६ हजार आणि दोन लाख ८० हजार रुपयांचे दोन धनादेश शेअर्स खरेदीसाठी वेंचुरा सिक्युरीटीज यांना दिले. त्यानंतर ते धनादेश ७ जानेवारी २०१५ रोजी वठण्यासाठी बॅंककडे आले असता बॅंकेतील नेटचे सव्‍‌र्हर डाऊन असल्याने भाटिया यांची स्वाक्षरी जुळण्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचणींचा उल्लेख न करता बँकेने ‘स्वाक्षरी जुळत नाही’ असा शेरा लावून धनादेश परत पाठवले. त्यानंतर भाटिया यांनी १० जानेवारी रोजी हे धनादेश पुन्हा बँकेत पाठवले. परंतु, त्या दिवशीही सव्‍‌र्हर डाउन असल्याने ‘स्वाक्षरी जुळत नाही’ असे कारण सांगत बँकेने धनादेश परत पाठवले. या गोंधळामुळे भाटिया यांना शेअर खरेदीविक्रीचा व्यवहार करता आला नाही.

बँकेच्या या गोंधळामुळे आपले दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत भाटिया यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती. भाटिया यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम असतानाही केवळ बँकेच्या यंत्रणेतील त्रुटींमुळे धनादेश वठले नाहीत व ते परत पाठवण्यात आल्याची बाब बँक व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आली. बॅंकेच्या तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकाचे नुकसान झाल्याने आर्थिक नुकसानभरपाई म्हणून ५० हजार आणि तक्रार खर्चाबद्दल तीन हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाचे सदस्य ना.द. कदम यांनी दिले आहेत. यासंबंधी महाराष्ट्र बँकेच्या मीरा रोड विभागाच्या शाखेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.