डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिलांसह इतर २५ ते ५० वयोगटातील महिला, पुरूष, तरूण सायकल पटू या महिन्यात डोंबिवलीतून सायकलवरून पंढरपुरच्या आषाढी वारीसाठी जाणार आहेत. या सायकलपटुंनी वाटेत वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्याचा आणि इतर सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त डोंबिवली एमआयडीसीत महिला सायकलपटू एकत्र आल्या होत्या. यावेळी सायकल दिनानिमित्त त्यांनी एमआयडीसीतील विविध रस्त्यांवर सायकल चालवून सराव केला. तसेच, या सायकल फेरीच्या माध्यमातून पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य आणि व्यायामाचा संदेश नागरिकांमध्ये दिला. या सायकल गटात साठ ते सत्तर वयोगटातील ज्येष्ठ नागरिक महिला आहेत. याशिवाय ४० ते ५० वयोगटातील महिलांचाही सहभाग या सायकल गटात आहे. काही पुरूष, तरूण मुले या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवितात.
डोंबिवली एमआयडीसीतील ४२ जणांच्या सायकल ग्रुपने पंढरपुरच्या आषाढी वारीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. १८ जून रोजी हा ग्रुप सायकलवरून पंढरपुरच्या दिशेने वारीसाठी निघेल. वाटेत वारकऱ्यांना खाऊचे वाटप, आरोग्य तपासणी असे उपक्रम ते राबविणार आहेत. या सायकल ग्रुपच्या माध्यमातून डोंबिवली शहर परिसरातील नागरिकांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी काही मदत करायची असेल तर त्यांनी या सायकल गटातील महिलांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हर्षल सरोदे, सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे, कल्पना बोंडे हे ४२ जणांच्या सायकल गटाचे नेतृत्व करत आहेत.या सायकल ग्रुपने सोबत बस, रुग्णवाहिका, टेम्पो आणि आवश्यक सामग्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी वारीतील सेवेनंतर २२ जून रोजी हा सायकल ग्रुप पुन्हा डोंंबिवलीच्या दिशेने माघारी येणार आहे. वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोणाही नागरिकाला काही साहाय्यक करायचे असेल तर त्यांनी हर्षल सरोदे ८४२४९२७३११ येथे किंवा शुभम उदबत्ती स्टाॅल, कावेरी चौक, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे संपर्क साधण्याचे आवाहन सायकल ग्रुपने केले आहे.