Thane Dahi Handi 2025 Celebration: वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात मुंबईतील जोगेश्वरीच्या कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला. या विश्वविक्रमानंतर पथकातील एक गोविंदा पथकाने प्रतिक्रिया व्यक्त केली.

ठाणे येथील वर्तकनगर भागातील मैदानात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. या मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या उत्सवात २०२५ मधील पहिले १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर ९ थरांचा विश्वविक्रम घडला होता. आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पथकाने नवा इतिहास घडवला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,”गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब यांची परंपरा आम्ही पुढे नेली. आजचा हा क्षण तर अत्यंत गौरवाचा आहे.”, असे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

पुर्वेश सरनाईक म्हणाले, “यापूर्वी आमच्या मंचावर ९ थरांचा विक्रम झाला होता. आज १० थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान आहे. कोकण नगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. मला विश्वास होता की कोकणनगर विश्वविक्रम रचेल, माझा हा विश्वास सार्थ ठरला.”, असे संस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले.

पथकातील गोविंदा म्हणाला कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने दहा थरांचा विश्वविक्रम केला. त्यानंतर या पथकातील विशाल कोचरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “ आम्हाला आत्मविश्वास होता की यंदा आम्ही १० थर लावणार. आम्ही २०२२ मध्ये इथेच येऊन नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. यावेळेस आमच्या पथकात ५५० गोविंदा होते आणि आम्ही दोन महिने सराव केला होता. पहिल्या दिवसापासून दहा थरांचा सराव करत होतो. आमचे प्रशिक्षक म्हणाले होते की, जखमी न होता तुम्ही हे थर लावा”.