ठाणे : वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात मुंबईतील जोगेश्वरीच्या कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करत या विश्वविक्रमाबाबत प्रतिक्रीया दिला. त्यावेळी “काही गोविंदा पथकांना वाटत होते की, आमचा विक्रम कोणी मोडणार नाही”, असे सरनाईक म्हणाले. त्यांनी असे विधान का केले, याची चर्चा आता रंगली आहे.
बईसह, ठाणे आणि उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित मंडळानी दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे. अशाचप्रकारे ठाणे येथील वर्तकनगर भागातील मैदानात प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. या मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या उत्सवात २०२५ मधील पहिले १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
काही गोविंदा पथकानं वाटते मी पारितोषिक आधीच जाहीर केले होते. कोकणनगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी राष्ट्रभक्ती दाखवली, कोणी कितीही काही म्हणून द्या. तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाख जाहीर करतो, असे सरनाईक यांनी सांगितले. काही गोविंदा पथकाना वाटते की, आमचा विश्वविक्रम कोणी मोडणार नाही. पण, दुसरे पथक देखील विश्वविक्रम मोडत असतो. विश्व विक्रम हा मोडण्यासाठीच असतो. याच मैदानावर आधी पण विश्व विक्रम झाला आहे आणि आताही झाला आहे, असे सरनाईक म्हणाले. त्यांनी असे विधान का केले, याची चर्चा आता रंगली आहे.
सरनाईक असे का म्हणाले..
‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणाऱ्या जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाची तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याची संधी हुकली होती. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोप जय जवान पथकाने केला होता. यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणे नडले की काय, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. त्यात जय जवान गोविंदा पथकाने नोंदणी करण्यास उशीर केल्यामुळे नियमानुसार तिसऱ्या पर्वात संधी दिली नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने दहा थरांचा विश्वविक्रम केल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी प्रतिक्रीया देताना जय जवान पथकाला टोला लगावल्याची चर्चा आहे.