कल्याण – कल्याण शहर परिसरात दहशत पसरवून विविध प्रकारचे गुन्हे करणारा कल्याण पूर्व खडेगोळवली भागातील खतरनाक गुंड अरबाज हबीब शेख (२३) याला एक वर्षासाठी पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरून स्थानबध्द करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून शनिवारी त्याची रवानगी नाशिक रोड यथील मध्यवर्ति कारागृहात करण्यात आली.
कोळसवाडी पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली. कल्याण पूर्व खडेगोळवली भागातील अवधराम नगर, साईबाबा मंदिरजवळ, कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत राहणारा अरबाज शेख हा मागील अनेक वर्षापासून कल्याण शहर परिरसरात विविध प्रकारचे गुन्हे करत आहे. त्याच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हे दाखल आहेत. एक धोकादायक गुंड म्हणून अरबाजची ओळख आहे. पोलिसांनी त्याला अनेक वेळा अटक केली होती. पण त्याची जामिनावर सुटका होत होती. बाहेर आल्यावर तो पुन्हा आपल्या गु्न्हेगारी कारवाया सुरू करत होता.
अरबाजच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांबद्दल कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी एक अहवाल पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना पाठविला होता. त्यानंतर हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. अरबाज शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन आणि त्याच्याकडून वेळोवेळी होणाऱ्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात अशांतात, कायदा आणि सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरविणे, वाळू तस्करी, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन आणि विक्री, हातभट्टीवाले, झोपडपट्टी गुंड अशा अनेक कलमाने अरबाजवर गुन्हे दाखल होते.
स्थानिक रहिवासी अरबाजच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांविषयी अस्वस्थ होते. त्याच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली तर त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका निर्माण होईल म्हणून उघडपणे तक्रार करण्यास कोणीही पुढाकार घेत नव्हता. पण अरबाजच्या कल्याण पूर्व भागात चाललेल्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची माहिती स्थानिकांकडून पोलिसांनी तोंडी स्वरूपात दिली जात होती. थेट तक्रार होत नसल्याने पोलिसांची अडचण होत होती. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी अशा झोपडपट्टी गुंडांपासून कोणत्याही प्रकारचे त्रास नागरिकांना होऊ नयेत म्हणून पोलीस शेखच्या हालचालींवर नजर ठेऊन होते.
गेल्या वर्षभरच्या कालावधीत कल्याण पूर्वेतील चार ते पाच गुंड पोलिसांनी तडीपार केले आहेत. चक्कीनाका येथील एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार आणि तिचा खून झाल्यानंतर कल्याण पूर्व भागातील एकाच घरातील तीन भाऊ तडीपार करण्यात आले होते. आता खडेगोळवली भागातील अरबाज शेख याची एक वर्षाच्या कालावधीसाठी नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.