ठाणे – येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल मात्र गायमुख रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अद्याप झाले नाही. प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावे आणि रस्त्यावर सध्या मास्टिकचे काम करून खड्डेमुक्त करावा अशा स्पष्ट सुचना उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा प्रशासनाला दिले. तर वनविभागाने परवानगी दिली नसल्याने काँक्रीटीकरण झाले नसल्याची बाब समोर आल्यास संतप्त होऊन एकनाथ शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला.

” जुन्या रस्त्याच्या कामाला कशासाठी हव्यात परवानग्या, तुमच्या परवानग्यांपेक्षा माणसाचा जीव मोठा आहे. सार्वजनिक हिताच्या आड आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू ” अशा शब्दात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वनविभागाला खडसावले. पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि खरीप हंगाम नियोजन बाबत उपमुख्यमंत्री आणि ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती दलाच्या दोन टीम ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तसेच गरज असल्यास टीडीआरएफची देखील टीम तयार आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना उद्भवल्यास नागरिकांना वेळीच मदत पोहोचवणे शक्य असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाने सर्व बाबींमध्ये सतर्कता बाळगावी. जिल्ह्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका तसेच ग्रामीण भाग येथील धोकादायक इमारती, घरे यांची चाचपणी करून त्या धोकादायक निवासस्थानी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे. जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना घडणार नाही. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वय साधून शहरातील रस्ते वाहतुकीसाठी सुसज्ज ठेवावेत. खड्डे पडले असल्यास तातडीने ते खड्डे भरून काढावेत.

खड्ड्यात पडून कोणाचा मृत्यू झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना देखील पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या. जिल्ह्यात दरड प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना राबविण्यात याव्या. या सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे भागांमधून पाणी काढण्यासाठी पंपची सुविधा करण्यात यावी, अशा सूचना ही शिंदे यांनी दिल्या.

धोकादायक होर्डिंग तातडीने हटवा

जिल्ह्यातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. तर या स्ट्रक्चरल ऑडिट दरम्यान आढळून येणारे बेकायदेशीर होर्डिंग तातडीने काढून टाकण्यात यावे. आणि त्याचा साचा देखील जागीच तोडण्यात यावा. जर भविष्यात बेकायदा होर्डिंग मुळे दुर्घटना घडली तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बैठकीत दिला.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे नियोजन योग्य पद्धतीने झाले आहे. भात पीक जिल्ह्याचे मुख्य पीक असून यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने वाढ होईल यासाठी कृषी विभाग कार्यरत आहे. शेतकऱ्यांनी देखील सामूहिक शेती अर्थात क्लस्टर पद्धतीने शेती करण्याचा प्रयोग राबवावा यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बोगस बी बियाणे कोणत्याही विक्रेत्याने दिले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.