ठाणे : भिवंडी येथे गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये दोन गटामध्ये झालेल्या वादानंतर भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी (आयपीएस) यांना हे प्रकरण भोवले आहे. परोपकारी यांची थेट ठाणे शहर मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तर, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त मोहन दहिकर यांची नियुक्ती भिवंडीच्या पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

हेही वाचा >>> अवजड वाहनांची अवेळी वाहतुक सुरूच; मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी

भिवंडी येथून बुधवारी मध्यरात्री १२.३० वाजाता एका मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. मिरवणूक वंजारपट्टी नाका परिसरात आली असता, अचानक दगडफेक झाल्याचा आरोप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर या भागात मोठ्याप्रमाणात जमाव गोळा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घटनास्थळी पोलीस पथके दाखल झाली. आरोपींविरोधात कारवाई झाल्याशिवाय गणेश विसर्जन होणार नाही अशी मागणी मंडळातील कार्यकर्त्यांनी सुरू केली.

हेही वाचा >>> धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहीवेळाने दोन्ही गटामध्ये गर्दी जमू लागल्याने परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर जात होती. अखेर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही पोलीस देखील जखमी झाले आहेत. जमावातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भिवंडीतील इतर दोन ठिकाणी देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत मिळत होते. अखेर बुधवारी रात्री उशीरा भिवंडीचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांची बदली मुख्यालयात करण्यात आली. तर मुख्यालय एकचे उपायुक्त मोहन दहिकर यांची भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. परोपकारी यांची काही महिन्यांपूर्वीच विशेष शाखेतून भिवंडीच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. परंतु भिवंडीतील दोन गटामध्ये झालेला वाद परोपकारी यांना भोवला आहे.