निखिल अहिरे, लोकसत्ता

ठाणे : देशातील मालवाहतूक जलदगतीने व्हावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष मालवाहतूक मार्गिका (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डीएफसी) प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यांतील १२ गावांतून ४० किमी लांब मार्गिका जाणार आहे. या मार्गिकेच्या आड येणारी ६०२ बांधकामे जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत जमीनदोस्त केली असून उर्वरित बांधकामेही लवकरच हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळणार आहे.

‘डीएफसी’ प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १८० किमी लांबीची रेल्वे मार्गिका निर्माण करण्यात येत आहे. या एकूण प्रकल्पासाठी ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील १०२ गावांमधील २५० हेक्टर खासगी आणि १७८ हेक्टर शासकीर जमीन संपादित केली जात आहे.  त्यापैकी ४० किमी लांबीची मार्गिका ठाणे जिल्ह्यातून जाते. तर, यासाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी तालुक्यांतील एकूण १२ गावांतील ८८९ झोपडय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या  सर्वेक्षणात जिल्हा प्रशासनाकडून रेल्वे मार्गिकेच्या आड येणाऱ्या ८८९ झोपडीधारकांपैकी ७९४ झोपडीधारकांना पात्र तर उर्वरित झोपडीधारकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पात्र धारकांपैकी  ७०२ धारकांना प्रत्येकी १४ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. तर उर्वरित पात्र झोपडीधारकांकडून जागा सोडण्यासाठीचे हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनातर्फे या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने  या प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरणाचे काम संथगतीने सुरू होते. मागील काही महिन्यांपासून परिस्थितीत सुधारणा झाल्याने पुनर्वसनाचा मोबदला मिळालेल्या नागरिकांची घरे पाडण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. एकूण पात्र झोपडय़ांपैकी ६०२ झोपडय़ा पाडण्यात आल्या आहेत. उर्वरित बांधकामेदेखील लवकरच हटविण्यात आली येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्यातील बाधित गावे

* कल्याण तालुका – भोपर, कोपर, ठाकुर्ली, आयरे, गावदेवी, जुनी डोंबिवली, गावदेवी – ठाकुर्ली,

* भिवंडी तालुका – वढूनवघर, खारबांव, डुंगे, पिंपळास आणि

वडघर प्रकल्पाचा फायदा काय?

हा  प्रकल्प प्रामुख्याने पूर्व डीएफसी आणि पश्चिम डीएफसी या दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यातील पश्चिम डीएफसी रेल्वे मार्ग हा महाराष्ट्र राज्यातून जात आहे. हा मार्ग मुंबईजवळील जवाहरलाल नेहरू बंदर येथून सुरू होऊन पुढे ठाणेमार्गे उत्तरेकडे दिल्लीपर्यंत जाणार आहे. हा मालवाहतूक मार्ग मुंबईतील बंदरांना जोडणार असून भविष्यात होणाऱ्या दिल्ली – मुंबई औद्योगिक पट्टय़ासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच मालगाडय़ांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका झाल्यास ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांना मोकळा मार्ग मिळणार आहे.

या प्रकल्पामध्ये येणाऱ्या बांधकामांचे बहुतांश पाडकाम करण्यात आले आहे. तसेच पात्र बाधितांपैकी ८० टक्के बाधितांना मोबदलाही देण्यात आला आहे. उर्वरित जमिनीचे हस्तांतरण आणि बाधितांचे पुनर्वसनाचे  काम अंतिम आले आहे. – रेवती गायकर, पुनर्वसन, उपजिल्हाधिकारी, ठाणे