कल्याण : नागरिकांना तत्पर ऑनलाईन माध्यमातून शासन सुविधा, प्रतिसाद मिळाला पाहिजे म्हणून शासन प्रयत्नशील आहे. १०० दिवसांच्या कृतीशील उपक्रमातून शासनाने विविध विकास योजना पुढे नेण्याचे स्तुत्य उपक्रम हाती घेतले आहेत. अशा परिस्थितीत कल्याण तहसीलदार कार्यालयातून विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना एक महिने हेलपाटे मारावे लागत असल्याने विद्यार्थी, पालक, नागरिक त्रस्त आहेत.
यापूर्वी कल्याण तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा मध्यस्थाच्या माध्यमातून अधिवास, आर्थिक दुर्बल घटक, उत्पन्न किंवा इतर दाखला काढण्यासाठी कागदपत्रे दिल्यानंतर दोन ते तीन दिवसात नागरिकांना आवश्यक दाखला मिळत होता. गेल्या दोन महिन्यांपासून सेतू कार्यालयात स्वता किंवा मध्यस्थाच्या माध्यमातून गेले तरी दाखले मिळण्यास महिनाभराचा विलंब लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. त्यांना अधिवास, आर्थिक दुर्बल घटक दाखले, उत्पन्न दाखले लागतात. म्हाडाची घरांसाठी सोडत जाहीर झाली आहे. हे अर्ज भरण्यासाठी नागरिकांना नवीन पध्दतीचा अधिवास दाखला, उत्पन्न दाखल यांची गरज असते. हे दाखले मिळविण्यासाठी नागरिकांनी मागील महिनाभरापासून सेतू कार्यालयात, काहींनी मध्यस्थाच्या माध्यमातून आपली कागदपत्रे दिली आहेत. काही नागरिक स्वता सेतू कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. काही जण मध्यस्थाच्या घराचे, कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. त्यांना अद्यापी त्यांचे दाखले मिळाले नाहीत.
या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वडिलोपार्जित जन्मदाखल्यांची मागणी विद्यार्थी, पालकांकडे केली जात आहे. अनेकांना ही कागदपत्रे सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांची कुचंबणा होत आहे. काही महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवली परिसरातून ५० हून अधिक बांग्लादेशी घुसखोर पोलिसांनी पकडले. काही जणांकडे पोलिसांना आधारकार्ड, शिधावाटप पत्रिका अशी अधिवासाची कागदपत्रे आढळून आली. राजकीय नेत्यांनी यासंदर्भात महसूल कार्यालयावर मोर्चे काढले.
त्यानंतर महसूल विभागांनी महसूल विभागाकडून देण्यात येणारा दाखल देताना विविध प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता, सत्यप्रतित्रापत्र, हमीपत्र असे नवीन कागदपत्रे मागण्यास सुरूवात केली. या कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिक, मध्यस्थांची दमछाक होत आहे. बांग्लादेशी घुसखोरांचा फटकाही या दाखल्यांना बसला असल्याची चर्चा काही मध्यस्थ करत आहेत.
नागरिकांना आपण दाखले वेळेत देऊ शकत नाहीत म्हणून काही मध्यस्थांनी आपली सेतू कार्यालयातील कामे थांबवली आहेत. जे काम यापूर्वी आठशे ते नऊशे रुपयांना होत होते. त्या कामासाठी आता मध्यस्थ सुमारे चार हजार रूपये मागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दाखले काढताना विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे तयार करावी लागतात, अशी कारणे मध्यस्थांकडून देण्यात येतात.
याशिवाय राजकीय मंडळींकडून एक दिवसाचे दाखला शिबीर आयोजित केले जाते. या शिबीरांमधील दाखल्यांचे गठ्ठे महसूल कार्यालयात स्वाक्षरीसाठी येतात. काही वेळा सेतू कार्यालयातील सर्व्हर संथगतीने काम करतो. त्याचा फटका गतिमान कामाला बसतो. सेतू कार्यालयातील व्यवस्था आता शिस्तप्रिय करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
सेतू कार्यालयातून नागरिकांना वेळेवर दाखले दिले जात आहेत. दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांची वेळेवर पूर्तता करणे आवश्यक आहे.-सचिन शेजाळ तहसीलदार