उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील चालिया मंदिरा जवळील साई लखन जीवन घोट गोशाळेच्या विश्वस्तांकडे दोन कोटीची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर गोशाळेला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत विष टाकून गोशाळेतील २५० गाई मारून टाकू, अशी धमकी विश्वस्तांना दिली. मागील वर्षभर महिला आणि तिची दोन मुले गोशाळेच्या विश्वस्तांना खंडणीसाठी त्रास देत होती. विश्वस्तांनी न्यायालयात तिघांच्या विरुध्द एक दावा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन खंडणी मागणाऱ्या तीन जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश हिललाईन पोलीस ठाण्याला दिले. पोलिसांनी गोशाळा विश्वस्त गोकुळदास दुसेजा (५७) यांच्या तक्रारीवरून तिघांविरूध्द धमकावणे, खंडणी मागणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प पाचमध्ये चालिया मंदिराजवळ ३५ वर्ष जुनी साई लखन जीवन घोट गोशाळा आहे. २५० गाई येथे आहेत. गोकुळदास दुसेजा, बलराम बांगा व इतर सदस्य गोशाळेचा कारभार पाहतात. गोशाळेच्या माध्यमातून आरोग्य, गरीबांना मदत अशी सामाजिक सेवेची कामे केली जातात. गोशाळेला लागून असलेला जमिनीचा एक पट्टा स्वामी रूपाराम यांच्या मालकीचा आहे. स्वामींचे सहा वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हापासून आरोपी वेळोवेळी गोशाळेच्या विश्वस्तांना स्वामी रूपाराम यांची जमीन हडप करण्यासाठी त्रास देत आहेत. गोशाळा व्यवस्थित चालविण्याच्या विषयावर विश्वस्तांकडे दोन कोटीची खंडणीची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण न झाल्याने गोशाळेला बाजुच्या विहिरीतून होणारा पाणी पुरवठा तोडून टाकणे, पाणी पुरवठा यंत्र चोरून नेणे असे प्रकार सुरू केले होते. जोपर्यंत तुम्ही आमची खंडणीची मागणी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला असा त्रास होणारच अशी उघड गोशाळा विश्वस्तांना दिली जात होती. एवढेच नाही तर यापुढे गोशाळेला पाणी पुर‌वठा करणाऱ्या विहिरीत विष टाकू आणि येथील २५० गाई मारून टाकू. तसेच ठिकाणी समाधी बांधू अशी धमकी विश्वस्तांना दिली होती.

त्रास वाढू लागल्याने गोशाळा विश्वस्तांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने गोशाळेला होणारा त्रास विचारात घेऊन आरोपींविरुध्द धमकावणे, खंडणी मागणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगरमधील हिललाईन पोलिसांना दिले. विश्वस्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.