कल्याण – कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील एका ३१ वर्षीय रहिवाशाचा डेंग्युने मृत्यू झाला आहे. या रुग्णावर सोमवारपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाने या रुग्णाच्या नातेवाईकाला मुंबईत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्याचे सूचित केले होते. पण, नातेवाईकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या रुग्णाचा उपचारा दरम्यान गुरूवारी मृत्यू झाला.

विलास भगवान म्हात्रे असे या मृत रुग्णाचे नाव आहे. ते बेतुरकरपाडा भागात कुटुंबीयांसमवेत राहत होते. पालिका हद्दीत पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच डेंग्युची बाधा होऊन एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णाच्या मृत्यूनंतर पालिका साथ आजार नियंत्रणासाठी प्रभावी उपाय करत असल्याचे जाहीर केले असले तरी कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात उघड्यावर पदार्थ विकणाऱ्या वडापाव, पाणीपुरी, भेळपुरी आणि इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या राजरोस सुरू आहेत. संध्याकाळच्या वेळेत या गाड्या नागरिकांनी गजबजूुन गेलेल्या असतात. फेरीवाला हटाव पथकांच्या संगनमताने या गाड्या सुरू असल्याचे सांगितले जाते.

शहराच्या मुख्य वर्दळीच्या भागात नवीन बांधकामे राजरोस सुरू आहेत. या बांधकामांचे लोखंडी आणि इतर साहित्य रस्ते, पदपथ अडवून ठेवलेले असते. त्याठिकाणी पावसाचे पाणी अडून डासांच्या अळ्या तयार होत आहेत. महिन्यातून एकदा धूर फवारणीची जीप एका प्रभागात फिरवली जाते. पालिकेकडून नियमित होणारी जंतूनाशक होणारी फवारणी पूर्ण ठप्प असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून पालिकेचा वैद्यकीय आरोग्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिका आरोग्य विभागावर वचक ठेवणारा प्रभावी नियंत्रक अधिकारी नसल्याने शासनाने कल्याण डोंबिवली पालिकेत शासन सेवेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी देण्याची मागणी यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केली आहे. गेल्या आठवड्यात करोना काळातील मुदत संपलेली औषधे वरिष्ठांची परवानगी न घेता उंबर्डे येथील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट कचराभूमीवर टाकल्याचे प्रकरण उघडकीला आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

पालिकेचे आरोग्य कर्मचारी असताना अनिल शिरपूरकर या मुख्य मिश्रकाने आरोग्य विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपला डोंबिवली देसलेपाडा येथील गाळा आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी देऊन एक लाख रूपये भाड्याचा लाभ घेतला असल्याचे प्रकरण लोकसत्ताने उघडकीला आणले आहे. या सर्व प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि शासनस्तरावरून याप्रकरणाची चौकशी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्य विभागात गोंधळ सुरू असुनही याप्रकरणी कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई होत नसल्याने कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या प्रमुख डाॅ. दीपा शुक्ल यांनी मात्र पावसाळ्यात साथ आजार पसरू नयेत म्हणून प्रशासनाने आवश्यक खबरदऱ्या घेतल्या आहेत, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.