लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिका क्षेत्रात गेल्या १८ दिवसांत शहरात मलेरियाचे २० तर, डेंग्युचे ७ रुग्ण आढळून आले असून त्याचबरोबर कावीळ, विषमज्वर, जुलाब आणि एच३ एन२, लेप्टोस्पायरोसिस या आजारांचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांचा संसर्ग वाढू नये यासाठी ठाणे महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येतात. त्यात शहरात धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे, घरोघरी जाऊन रक्त तपासणी करणे अशा उपाययोजना करण्यात येतात. याशिवाय, शहरात ठिकठिकाणी पत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येते. यंदाही पालिकेकडून अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तरिही शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. परंतु रुग्ण संख्या कमी असल्याने साथीचे आजार आटोक्यात असल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… कल्याण मध्ये टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे सहाय्यकाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरात जुलै महिन्यात म्हणजेच गेल्या १८ दिवसांत मलेरियाचे २० तर, डेंग्युचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात ३२१० घरांचे सर्वेक्षण करून ५६ जणांचे रक्त नमुने घेण्यात आले तर, १७२ ठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये २३ एच३ एन२ चे रुग्ण आढळून आले. २१४ घरांच्या सर्वेक्षणात ८ कावीळचे रुग्ण, ८४४ घरांच्या सर्वेक्षणात २२ विषमज्वर, ६०० घरांच्या सर्वेक्षणात २८ जुलाबाचे रुग्ण आणि १२७४ घरांच्या सर्वेक्षणात १६ लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढल्याने साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ होण्याची भिती व्यक्त होत आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली