Eknath shinde on Uddhav Thackeray:ठाणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना गुरुवारी रात्री जेवणासाठी आमंत्रित केले होते. या बैठकीसाठी राज्यातून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे नेते देखील सहभागी झाले होते. दरम्यान या बैठकीवेळी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे हे ठाण्यातील एका कार्यक्रमात होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे शेवटच्या रांगेत बसल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता, ज्यांचा अपमान झाला त्यांना त्याच्यावर काही वाटत नाही, त्यामुळे मला त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. परंतु जे स्वाभिमान गहाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार गहाण टाकतात. त्यांना त्याचे काही वाटणारच नाही. काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखविली असेल अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत, त्यांचे असेच होणार. विचार हे पुढे असतात आणि लाचार मागे असतात असेही शिंदे म्हणाले.

खासदार म्हस्के यांचीही टीका

औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांना आग्रा, दिल्ली येथे आमंत्रित केले गेले होते. परंतु तिथल्या दरबारात त्यांना 4000 मनसबदारी असलेल्या सरदारांच्या रांगेत बसवल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हा अपमान वाटल्याने ते तिथून निघून गेले. अपमानाने पेटून उठणारे शिवाजी महाराज कुठे आणि शिवाजी महाराजांचे नाव घेणारे मित्र पक्षांच्या बैठकीत शेवटच्या रांगेत ढकलले गेले तरीही बसून राहणारे उद्धव ठाकरे कुठे, ही दृश्ये महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याची घणाघाती टिका शिवसेना मुख्य प्रवक्ते खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

एकीकडे शिवाजी महाराजांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांच्या प्रत्येक आदर्शांना हरताळ फासत जायचा हेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेस बरोबर गेल्यानंतर सुरू केले आहे. ज्यांचे वारसदार ते स्वत:ला म्हणतात त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक विचाराला काळे फासण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्यांना ते गद्दार-गद्दार म्हणून हिणवतात त्या शिंदे साहेबांनी मात्र प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा, शिवसेनेचा, बाळासाहेबांचा, शिवरायांचा मान राखण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

दोन पक्षांची तुलना करा खरी शिवसेना जिला मित्र पक्षांकडून, मित्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून मान मिळतो, सन्मान होतो, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं आणि शिवसेना उबाठा गटाला दिल्लीत जाऊन राहुल गांधी कसं वागवतात ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांचे मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि शरद पवार गट त्यांच्याशी कसे वागतात हे अनेक वायरल व्हिडिओ मधून समोर असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

आदरणीय बाळासाहेबांनी अत्यंत कष्टाने वाढलेला वटवृक्ष उद्धव ठाकरेंनी आपल्या चुकीचा निर्णय आणि कृतीने पोखरून टाकला. त्यांच्याबरोबर असलेले, आजूबाजूला वावरणारे कोल्हे हा वृक्ष पाडायचा दररोज प्रयत्न करतात. त्यांचे 40 आमदार आणि खासदार त्यांना सोडून निघून गेले. त्या पुढच्या निवडणुकीत पक्षाची पूर्ती वाट लागली तरीही उद्धव ठाकरे यांना जाग येत नाही, हे दुर्दैव असल्याची टिका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

संजय राऊत भांडी घासायला

बैठकीनंतर संजय राऊत यांना भांडी घासायला सांगण्यात आली होती, अशी पक्की खबर आमच्याकडे आहे. मी भांडी घासतो पण माझा फोटो कुणी काढायचा नाही, ही गांजा राऊतची अट मान्य करण्यात आली. त्यानंतर गांज्या राऊतने भांडी घासली. जोपर्यंत राऊत सगळी भांडी घासत नाही तोपर्यंत उबाठा आणि त्यांच्या लेकाला बाहेर सोडले जात नव्हते असंही कळलंय. महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…थोडा जरी स्वाभिमान, आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे अशी उपरोधिक टिकाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.