ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिका उभारणीचे काम सुरू असून मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल. याशिवाय, भाईंदरपाडा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला करण्याबरोबरच घोडबंदर रस्ता रुंद करण्याचे काम सुरू आहे. यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाईंदरपाडा उड्डाणपुल लोकार्पण कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच यंदाच्या वर्षाअखेरीस घोडबंदर मार्गावरील मेट्रो प्रकल्पाची चाचणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

घोडबंदर मार्गावरील भाईंदर पाडा उड्डाणपुलाचे लोकार्पण बुधलारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे उपस्थित होेते. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांची माहिती दिली. भाईंदर पाडा परिसरातील रस्त्यावर उड्डाण पुल उभारण्यात आला असून त्यावर मेट्रोची मार्गिका उभारण्यात आलेली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अशी डबलडेकर पुलाची संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आली आहे. रस्ते आणि पुल मार्गे वाहनांची वाहतूक होणार आहे. तर, उड्डाणपुलावरील मार्गिकेवरून मेट्रोची वाहतूक सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांचा तिहेरी फायदा होणार आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार असून त्याचबरोबर या भागातील घरांच्या किंमती वाढू शकतील, असे शिंदे म्हणाले.

मुंबई महानगर क्षेत्रात एकूण ३३७ किमीचे मेट्रो जाळे विणले जात आहे. ठाण्यात मेट्रो प्रकल्प राबविणे व्यवहार्य नाही आणि मेट्रोला प्रवासी मिळणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मी आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी आग्रह धरला आणि मेट्रो प्रकल्पाला मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चालना मिळाली आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी चालना मिळाली, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रायगड, ठाणे जिल्हा, पालघरमधील विरारपर्यत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यामुळे नवी मुंबई, ठाणे मिरा-भाईंदर, मुंबई, विरार ही एकमेकांना शहरे जोडली जाणार आहेत. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबई महानगर प्रदेशात उभे राहत आहे, असेही शिंदे म्हणाले.

दहिसर-काशीगाव आणि वडाळा ते गायमुख असा मेट्रो मार्ग उभारला जात आहे. याशिवाय, गायमुख ते दहीसर असा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी जमीन संपादन करण्याचे आदेश देण्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे. मेट्रो मार्गाचे एक वर्तुळ पुर्ण होऊन ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, मुंबई आणि विरार ही शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ज्या शहरांतील सार्वजनिक व्यवस्था चांगली असते, तिथे नागरिक स्वत:च्या गाडीने प्रवास करत नाहीत. अशाचप्रकारे याठिकाणी मेट्रोने नागरिकांनी प्रवास केला तर, वाहतूक कोंडी कमी होईल. प्रदुषण कमी होईल. लोक वेळेवर कामावर पोहचतील आणि चांगले काम करतील, घरीही लवकर परतील, असे शिंदे म्हणाले.