ठाणे : राज्यात मराठी शाळांची पीछेहाट सुरू असल्याची चर्चा एकीकडे सुरू असताना, ठाणे जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मात्र पटसंख्या वाढल्याचे चित्र आहे. शैक्षणिक वर्षे २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात ११ हजारहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या दिशा उपक्रमाचा हा सकारात्मक परिणाम असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२८ शाळा आहेत. गेले अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची झालेली जीर्ण अवस्था, शिक्षकांची अपुरी संख्या आणि शैक्षणिक साधनसामग्रीचा अभाव त्यात दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा वाढता कल यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील पटसंख्येवर परिणाम होताना दिसत होता.
जिल्हा परिषदेच्या शाळांची ही परिस्थिती बदलावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून गेले दीड वर्षांपासून दिशा उपक्रम राबविला जात आहे. सध्याचा काळ हा कृत्रीम बुद्धिमत्तेचा आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेले दीड वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत होताना दिसत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर ओळखून त्याला वैयक्तिकृत शिक्षण दिले जाते. या प्रक्रियेतून जर विद्यार्थी सर्व स्तरापर्यंत पोहोचला तर, त्याची वेगवेगळ्या सर्वांगीण विकासासह स्पर्धा परिक्षांची तयारी करुन घेतली जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या स्तरावर आहे याची चाचणी दर महिन्याला घेतली जात आहे. या उपक्रमाचे राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात यंदाच्या शैक्षणिक वर्षात ११ हजार ७९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
सर्वाधिक प्रवेश शहापूर तालुक्यात
ठाणे जिल्हा परिषद शाळेत यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीच्या वर्गात ११ हजार ७९२ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ४१ विद्यार्थ्यांचा प्रवेश शहापुर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाला आहे. तर, अंबरनाथ तालुक्यातील शाळांमध्ये सर्वात कमी म्हणजे ८८६ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे.
जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या (तालुकानिहाय्य)
तालुका | विद्यार्थी संख्या |
कल्याण | १,३१९ |
मुरबाड | ३,०८८ |
शहापूर | ४,०४१ |
भिवंडी | २, ४५८ |
अंबरनाथ | ८८६ |
एकूण | ११,७९२ |