मासे, वटवाघळे, पक्ष्यांचा अधिवास उद्ध्वस्त 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान मंडलिक

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर येथील खाडी किनारी असलेले सुमारे ३५ एकरावरील विस्तीर्ण असे खारफुटीचे जंगल वाळू माफियांनी वाळूच्या उपशासाठी नष्ट केले आहे. खारफुटी जंगलाचा एक शेवटचा झालर पट्टा कोपर रेल्वे स्थानक परिसरात राखीव होता. काळय़ा धनाची हाव सुटलेल्या वाळू माफियांनी रेतीसाठी या राखीव जंगलाचा जीव घेतल्याने कोपरचा संपूर्ण खाडी परिसर आता उजाड करून टाकला आहे. डोंबिवली ते दिवा दरम्यान रेल्वे मार्गा लगत खारफुटीचे घनदाट जंगल होते. खाडीच्या आतील भागातही असेच घनदाट जंगल असेल असा निसर्ग, पर्यावरणप्रेमींचा अंदाज होता. वाळू माफियांनी मोठय़ा चलाखीने दिवा ते कोपर रेल्वे मार्गाला समांतर किनाऱ्यावर असलेली तिवरांची झाडे खाडीच्या आतील भागातील हालचाली कळू नयेत म्हणून कापली नव्हती. दरम्यान, डोंबिवली मोठागाव, रेतीबंदर खाडीतून बोटीने कोपर, दिवा भागात प्रवास करणाऱ्या पर्यावरण प्रेमींना खाडीतील सुमारे ३० ते ३५ एकर क्षेत्रफळावर पसरलेले खारफुटीचे (मॅनग्रोव्ह) जंगल माफियांनी बेचिराख केल्याचे दिसू लागले आहे. रेतीचा बेसुमार उपसा करण्यासाठीच हे जंगल कापले गेल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

करोना महासाथीच्या गेल्या दोन वर्षांत कठोर निर्बंधांमुळे खाडी किनारी शासकीय यंत्रणांचे लक्ष नव्हते. या यंत्रणा महासाथ रोखण्यात व्यग्र होत्या. त्याचा गैरफायदा माफियांनी घेऊन निसर्गसंपदेने डवरलेले हिरवेगार खारफुटीचे कोपर मधील जंगल नष्ट केले, अशी माहिती पर्यावरण, पक्षीप्रेमींनी दिली. वाळू उपसा करताना माफिया शस्त्रसज्ज असल्याने कोणी स्थानिक रहिवासी किंवा पर्यावरणप्रेमी त्यांना विरोध करण्यास पुढे जात नाही. महसूल अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली तरच ते वाळू उपसा थांबवितात. ते सामान्यांच्या तक्रारी किंवा विरोधाला जुमानत नाहीत, असे निसर्गप्रेमींनी सांगितले.

कोपर, मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी कल्याण, मोहने, आंबिवली, गांधारे, बारावे परिसरात निवास करत असलेली हजारो वटवाघळे अनेक वर्ष पहाटेच्या वेळेत शहरी भागातून कोपर खाडी किनारच्या खारफुटी जंगलात येऊन विसावा करतात. या वटवाघळांचा अधिवास खारफुटीचे जंगल नष्ट झाल्याने संपुष्टात आला आहे, असे पर्यावरण प्रेमी, पक्षी निरीक्षकांचे मत आहे. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत विविध प्रकारचे स्थलांतरित पक्ष्यांचा या जंगलात अधिवास असतो. आता त्यांचा अधिवास संपल्याने त्यांचे या भागातील अस्तित्व दुर्मीळ होईल, अशी प्रतिक्रिया पक्षीप्रेमी अर्णव पटवर्धन यांनी दिली. अनेक पक्षीप्रेमी पक्ष्यांचे छायाचित्रण करण्यासाठी या भागात नेहमी भ्रमंती करत होते. शहरांभोवतीची खारफुटीची जंगले ही शहरातील पर्यावरणाचा समतोल साधण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध प्रकारची जैवविविधता याठिकाणी पाहण्यास मिळते. महापूर, भरतीचे पाणी रोखून धरण्यात खारफुटी झाडे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने यापूर्वी महापूर आले तरी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कधी पाणी शिरले नाही. त्याच्या उलट परिस्थिती आपणास आता दिसू लागली आहे, अशी माहिती वनस्पती तज्ज्ञ डॉ. श्रेया भानप यांनी दिली.

शहरातील रस्ते, इमारतींसाठी काँक्रिटचा वापर केला जातो. काँक्रीटमधून कार्बन उत्सर्जन अधिक होते. ते शोषून घेण्याचे काम खारफुटीचे झाड करते. ही जंगले नष्ट झाल्याने कार्बन शोषला गेला नाही तर शहरी तापमानात वाढ होईल. माशांसह अनेक प्रजाती खारफुटी झाडाच्या मुळांशी विणीच्या काळात अंडी घालतात. काही प्रजाती, स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास खारफुटीवर असतात. जंगल नष्ट झाल्याने शहरावर दुष्परिणाम होतीलच, त्या बरोबर जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होणार आहे.

–  डॉ. श्रेया भानप,  वनस्पती तज्ज्ञ डोंबिवली

डोंबिवलीत खाडी किनारी रात्रीच्या वेळेत वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. रात्रीच्या वेळेत बोटीतून जाऊन वाळू उपसा करणाऱ्यांना पकडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. परंतु बोटीचा आवाज आणि प्रकाश दिसला की उपसा करणारे पळून जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत वाळू उपसा करणाऱ्यांना सापळा लावून पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

– जयराम देशमुख, तहसीलदार,कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Destroy forest fish birds bats habitat demolished ysh
First published on: 18-01-2022 at 01:35 IST