वसईच्या खाडीलगत दिमाखदार उभे असलेले पाली चर्च म्हणजे स्थापत्यकलेचा अनोखा आविष्कार! वसई किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या चर्चची उभारणी झाली ती सुमारे ४३० वर्षांपूर्वी म्हणजे १५८५ मध्ये. पवित्र मरियेला वाहिलेले हे पहिले चर्च. त्यामुळेच नाताळ सणाच्या एक आठवडा आधीच या चर्चचा थाटमाट सुरू होतो. फेस्ताच्या दिवसापासून नाताळगीते घरोघरी ऐकू येतात आणि मोठय़ा धूमधडाक्यात सण साजरा केला जातो.

वसई किल्लय़ात चार संघाचे धर्मगुरू वास्तव्य करत होते. त्यातले पहिले चर्च जे उभे आहे, ते संत अंतोनी यांना समर्पित केलेले. या संत आंतोनी चर्चमधून फ्रान्सिस्कन धर्मगुरू या चर्चची देखभाल पाहत असत. त्यांनी १५८५ या वर्षी पाली येथे चर्चची उभारणी केली. या चर्चची इमारत वेगवेगळ्या अवस्थेतून गेली आहे. वेगवेगळ्या काळात विस्तार विभाग जोडले गेले आहेत. वेगवेगळ्या धर्मगुरूंनी आपले कौशल्य त्यात दाखवले आहे. चर्चला साधे धर्मगुरू लाभले आहेत, तसे अलीकडच्या काळात उच्च विद्याविभूषितही लाभले आहेत. फादर मायकल रुझेरिअ, फा. फिलिप वाझ, सध्या असलेले फा. रॉबिन यांनी तर पीएच.डी. मिळवलेली आहे. या चर्चचे प्रमुख धर्मगुरू आहेत फा. नाझरेथ गाब्रु व फा. रेमंड रुमाव. पाली चर्चच्या धर्मग्रामात १३६५ ख्रिस्ती कुटुंबे असून त्यांची लोकसंख्या ५०१५ इतकी आहे.

पालीचा फेस्ता जवळ आला की वसई विभागाला एक आगळे वेगळे उधाण येते. निर्मळला जत्रा होते, पण पालीला फेस्ता होतो. पाली हे असे एकमेव चर्च आहे की जिथे फेस्ता होतो. प्रत्येक चर्चच्या सणाच्या दिवशी लहान-मोठय़ा जत्रा भरतात. परंतु फेस्ताची लज्जत काही औरच. दिवसभर उत्साहाला भरती येते. तिथे ख्रिस्ती कोण आणि ख्रि्रस्तेतर कोण असा भेदभाव केला जात नाही. कारण तो सण आहे माऊलीचा. माऊली कधीच भेदभाव करत नसते. पाली चर्चची जननी सर्वाना आसरा देते. वांद्रे येथील मोतमाऊलीच्या दर्शनाला जसे विविध धर्मातील लोक जातात, तसेच पाली येथील या उत्सवात विविध धर्मातील लोकही सहभागी होतात. या माऊलीला ‘माय दे देऊस’ म्हणजे देवाची माता हे नामाभिधान अगदी पोर्तुगीज काळापासून आहे. तिच्या नावाने होणाऱ्या सोहळय़ाला फेस्ता म्हणतात. डिसेंबर महिन्याच्या १८ तारखेला फेस्ता साजरा केला जातो. सर्व धर्माच्या लोकांना ही तारीख माहीत आहे आणि त्या दिवशी त्या चर्चच्या आवारात ते हजेरी लावणारच. मच्छीमार बांधवांची या माऊलीवर विशेष श्रद्धा. या फेस्ताच्या दिवशी मच्छीमार मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात आणि माऊलीला मेणबत्ती अर्पण करतात.

या चर्चच्या दक्षिणेला पाणजू बेट आहे. वसईच्या अन्य भागापासून हे बेट तसे अलिप्त आहे. मात्र या गावाचे पूर्वज या चर्चशी अगदी निगडित होते. तो वारसा या बेटावरील लोकांनी अद्यापही चालू ठेवला आहे. पाणजूप्रमाणे जवळच्या दरपाळे गावाचे रहिवासीही या चर्चच्या सणाला हजेरी लावतात. नायगाव हे तसे नवे स्थानक. हे गेल्या ४० ते ५० वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. त्या स्थानकाकडे जाणारा रस्ता या चर्चच्या जवळून जात असल्याने या स्थानकामुळे आणि या रस्त्यामुळे या चर्चचे महत्त्व अधिकाधिक वाढत चालले आहे. चर्चजवळ स्थानक आल्याने आणि येथील जमीन इमारतीसाठी सोयीस्कर वाटल्यामुळे अलीकडच्या काळात या परिसरात इमारतीची नवनवीन संकुले उभी राहत आहेत. त्या इमारतीत मुंबईतील ख्रिस्ती भाविक वास्तव्यास येत आहेत. त्यामुळे पालीचा परिसर आता बहुभाषिक झाला आहे.

या चर्चला लागूनच मराठी माध्यमाची शाळा होती. दिवस पालटले, गरजा बदलल्या, वातावरण इंग्लिशमय होऊ  लागले, तसेच पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची मागणी केली. त्यामुळे चर्चच्या अधिकाऱ्यांनी ‘जीजस अँड मेरी’ संघाच्या सिस्टरांना निमंत्रण दिले. त्या कॉन्व्हेंटच्या अधिपत्याखाली आज इंग्रजी माध्यमाची शाळा पाली येथे आहे.