“भाजपा सरकार असताना महाराष्ट्राचं पोलीस दल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत दबावाखाली आहे. अशा प्रकारचा राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डोंबिवलीमध्ये बोलताना केली.

“डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन, पोलीस ठाण्याला घेराव घालीन,” असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच, “हा विषय विधानसभेत मांडू,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

डोंबिवली येथे चार दिवसांपूर्वी एका भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला भेटण्यासाठी फडणवीस डोंबिवलीमध्ये आले होते. हा कार्यकर्ता भाजपाचा समाज माध्यम हाताळत होता. त्याच्यावरील जीवघेणा हल्ला हा राजकीय वादातूनच झाला असल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र या घटनेला चार दिवस उलटून गेले तरी देखील आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांवरील अशा प्रकारचा राजकीय दबाव अधोगतीकडे नेणारा आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी फडणवीस यांनी मोकाशी पाडा येथील शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा देखील उल्लेख केला. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची देखील माहिती घेऊन हे सगळे विषय विधानसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.