scorecardresearch

‘भाजपा मित्रपक्ष संपवायचं काम करते’ या टीकेवरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “पवार साहेबांचं दु:ख…”

बिहारमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंजाबमधील अकाली दल तसेच शिवसेनेचं उदाहरण देत भाजपावर केलेली टीका

‘भाजपा मित्रपक्ष संपवायचं काम करते’ या टीकेवरुन फडणवीसांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “पवार साहेबांचं दु:ख…”
ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नोंदवलं मत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाजपा मित्रपक्ष संपवतो या टीकेला उत्तर दिलं आहे. ठाण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवारांनी केलेल्या टीकेवरुन फडणवीस यांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला असताना त्यांनी, ‘पवार यांचं दु:ख वेगळं आहे’ असं म्हटलं. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या चिन्हावरुन सुरु असणाऱ्या कायदेशीर लढाईबद्दलही फडणवीस यांनी मत व्यक्त केलं.

नक्की पाहा >> Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या वक्तव्याच्या आधारे बिहारमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपावर टीका केली. यावेळी पवार यांनी शिवसेनेचाही उल्लेख केला. “भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीशकुमार यांची तक्रार आहे की, भाजपासोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे,” असं पवार म्हणाले.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना…”

“महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते,” असंही पवार यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

फडणवीसांचं उत्तर…
याच टीकेवर फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. मित्रपक्ष संपवायचं काम भाजपा करता असा आरोप शरद पवारांनी केलाय, असं म्हणत फडणवीस यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणूुन घ्यायचा प्रयत्न केला. या प्रश्नावर फडणवीस यांनी, “मला हे समजतच नाही की आमचा जो मित्र पक्ष आहे शिवसेना त्याच्यासोबत ५० लोक आहेत. आम्ही ११५ लोक आहोत. आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. काल त्यांच्या नऊ आणि आमच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पवार साहेबांचं दु:ख वेगळं आहे. ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> Photos: “…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला”; पूजा चव्हाण प्रकरणावरुन टीकेच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा खुलासा

सुशील कुमार मोदी यांनी भाजपाला धोका देणाऱ्या पक्षांचं काय होतं हे आपण महाराष्ट्रात पाहिलं या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, “आमचे ७५ लोक निवडून आले जेडीयूचे ४२ लोक निवडून आले तरी आम्ही नितेशजींना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भाजपा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही,” असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.