ठाणे – अंगारकी चतुर्थीनिमित्त ठाणे शहरातील गणपती मंदिरात मंगळवारी सकाळपासूनच भाविकांची गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना एकत्र आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. शहरात असलेल्या गणपती मंदिरांच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली होती. मंगलमय वातावरणात भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतले, तर दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या व्यवस्थापकांनी उत्तम अशी व्यवस्था केली होती.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध गणपती मंदिर प्रत्यक्षात टिटवाळ्यात आहे. हे मंदिर शहराबाहेर असल्याने अनेक ठाणेकरांना त्या मंदिरात जाणे शक्य होत नाही. परंतु, ठाणे शहराच्या हद्दीत कोपरी पूर्व तसेच जांभळी नाका येथे सिद्धिविनायक मंदिर आहे. त्याचबरोबर उपवन, यशोधन नगर, राबोडी अशा विविध ठिकाणी गणपती मंदिर आहेत. या मंदिरात भाविक नेहमीच मोठ्या संख्येने गणेशाच्या दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यंदा २१ वर्षांनंतर दुर्मीळ असा धार्मिक योग जुळून आला आहे.

अंगारकी चतुर्थी आणि श्रावण महिना एकत्र आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले गणेशाच्या दर्शनासाठी आले होते. अंगारकी निमित्त शहरातील सर्व गणपती मंदिरांच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

फुले, हार खरेदीस गर्दी

अंगारकी चतुर्थी निमित्त फुल बाजारालाही बहर आला होता. गणेशाच्या चरणी हार, फुले खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. मंदिराच्या शेजारीच हार विक्री करणाऱ्या दुकानातही नागरिकांनी गर्दी केली होती.

अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. पण चतुर्थीचा दिवस जर मंगळवारी आला, तर तिला “अंगारकी चतुर्थी” म्हणतात.‘अंगारक’ हा मंगळ ग्रहाचा अधिपती आहे. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार असल्याने, मंगळवारी आलेली चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने सर्व चतुर्थी व्रतांचे पुण्य मिळते.

कोपरी पूर्व येथे सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या मंदिरात भाविक सकाळपासून दर्शनासाठी तसेच अभिषेक करण्यासाठी येत आहेत. त्याचबरोबर हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने अनेक शहराबाहेरील देखील नागरिक येथे दर्शनासाठी येत आहेत असे मंदिर प्रशासनाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.