ठाणे : ठाण्यातील ढोकाळी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायलँड पार्क रोडवरील सुमारे ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर अचानक मूर्तीसह गायब झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिरच नाहीसे होण्याबरोबरच मंदिरातील चांदीचे पूजासामान, तसेच परिसरातील जुनी विहीरही बुजवण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करून घेण्यास नकार देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, त्यांनी याप्रकरणी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली.
ठाण्यातील ढोकाळी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हायलँड पार्क रोडवर सुमारे ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर आहे. २० सप्टेंबर रोजी नवरात्रीनिमित्त मंदिराची स्वच्छता करण्यासाठी काही ग्रामस्थ मंदिरात गेले असता, त्यांना मंदिरच जागेवरून गायब झाल्याचे दिसून आले. मंदिराच्या ठिकाणी आता रिकामी जागा असून, परिसर सपाट करण्यात आल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मंदिरात असलेल्या दैवताच्या मूर्ती, चांदीचे साहित्य गायब झाल्याचे आढळून आले होते. विहीरही बुजवण्यात आली आहे.
पोलिस नोंद घेत नाहीत?
या प्रकरणी जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. आमच्या देवाचं मंदिर ५० वर्षांपासून इथे होतं. आता मंदिरच गायब झालं, मूर्तीही नाहीत. पोलिसांकडे गेलो तरी ते फक्त तपास करतो म्हणतात, पण गुन्हा दाखल करत नाहीत, असे ग्रामस्थ म्हणाले.
आमदार संजय केळकर यांची तत्काळ दखल भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. केळकर म्हणाले, “ही बाब अत्यंत गंभीर आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. मंदिराचे अस्तित्व, मूर्तींचा मागोवा आणि विहीर बुजवण्याबाबत योग्य तपास व्हावा.”
ठाण्यातून राज्यभर प्रतिसाद
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात दर आठवड्याला नागरिक आपल्या तक्रारी मांडतात. केळकर यांचा हा उपक्रम आता फक्त ठाणेपुरता मर्यादित न राहता मुंबई, बदलापूर, रायगड, रत्नागिरी अशा जिल्ह्यांमधूनही नागरिक आपले प्रश्न घेऊन येत आहेत. सोमवारी झालेल्या सत्रात ढोकाळी मंदिर प्रकरणासोबतच घरफसवणूक, शैक्षणिक प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, नोकरीसंदर्भातील तक्रारी अशा विविध निवेदनांचा समावेश होता.
