भ्रमराला गंडविणारी भ्रमरी..

ठाणे शहराला येऊरच्या रूपाने निसर्गसंपन्न जंगलाचा शेजार लाभला आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण वनस्पती आहेत.

ठाणे शहराला येऊरच्या रूपाने निसर्गसंपन्न जंगलाचा शेजार लाभला आहे. या जंगलात विविध प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण वनस्पती आहेत. प्रत्येक ऋतूत येऊरच्या जंगलात नव्या गोष्टी पाहता येतात. सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येऊरच्या जंगलात आढळून येणाऱ्या हिरव्या नवलाईचा परिचय करून देणारी ही विशेष लेखमाला..

आ ता काही दिवसांत मृग नक्षत्र लागेल आणि पावसाला सुरुवात होईल. पाऊस येणार या कल्पनेनेसुद्धा किती बरं वाटतंय. नकोसा झालेला हा उन्हाळा. उष्मा संपत नाही आणि पाऊस येत नाही. नुसतेच मळभ दाटून आलेले. दमटपणा तर वाढत चाललाय. थोडक्यात हवामान नकोसे झालेले. मात्र अशाही वातावरणात निसर्गात काही जीवांना अंकुर फुटले आहेत. काही वनस्पती फुलल्या आहेत. गुलमोहोर, बहावा, कदंबासारखे यांच्या फुलण्याचा डंगोरा कुठेही पिटला जात नाही. कारण हे जीव अगदी छोटे आहेत. मात्र आकाराने लहान असले तरी यांचे कतृत्व खूप मोठे आहे.
अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये एका ऑर्किड कुळातल्या रोपाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अगदी पूर्ण वाढलेल्या या ऑर्किडच्या रोपाची उंचीही दीड-दोन फुटांपेक्षा अधिक नसते. इतर मोठय़ा वृक्षाच्या आधाराने हे ऑर्किड वाढते. मात्र तरीही ती बांडगुळे नाहीत. ऑर्किड किंवा आमरी यांना स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात. मोठय़ा झाडाकडून अन्नरस शोषून घेत नाहीत. थोडक्यात ज्या झाडाच्या आधाराने ते वाढतात, त्याला ते कसलाच त्रास देत नाहीत.
ठाण्यालगत असलेल्या येऊरच्या समृद्ध जंगलात ऐना या टर्मिनालिया कुलातील झाडांची संख्या प्रचंड आहे. चाळीस ते पन्नास फुट उंचीची ही झाडे ओळखायला अतिशय सोपी असतात. राखाडी रंगाचा बुंधा आणि त्यावर उभ्या आयताकृती पडलेल्या खाचा आणि ढपल्या. ऐनाच्या झाडाला पडलेल्या याच खाचांमधून सध्या एक वैशिष्टय़पूर्ण ऑर्किड उगवले आणि फुलले आहे. त्याचे नाव आहे- बी ऑर्किड. मराठीत याला भ्रमरी असेही म्हणतात. आधार वृक्षाच्या मध्यावर फुललेल्या या ऑर्किडला दीड ते दोन सें.मी. रुंदीची आणि दहा-पंधरा सें.मी. लांबीची हिरवी चिवट पाने असतात. त्यामधून एक तारेसारखा दीड फुटांचा देठ बाहेर येतो. या लांब देठाच्या टोकावर या ऑर्किडचे फूल असते. फूल फुलते असे म्हणण्याऐवजी माशी फुलते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या फुलांच्या पाकळ्यांवर जांभळट-लालसर रेषा असतात आणि त्यातली एक पाकळी हुबेहूब माशीसारखी दिसते. त्यामुळे परागीभवनाला मदत होते.
सामान्यत: फुलातला मध घेण्यासाठी कीटक, भुंगे, माशा त्या फुलावर आकर्षित होत असतात. मात्र गंमत म्हणजे बी-ऑर्किडच्या या फुलात मध नसतोच. मात्र या फुलाची एक पाकळी हुबेहूब माशीसारखी असते. अगदी डोळेसुद्धा हुबेहूब असतात. त्यामुळे नरमाशी या फुलाकडे मादी असल्याचे समजून आकर्षित होते. त्यातून परागीभवन घडते.
निसर्गात अशाच प्रकारे एकमेकांना मदत करत जगण्याची पद्धत रूढ आहे. त्याला सिम्बॉईसिस म्हणतात. कीटक, मुंग्या, पक्षी परागीभवन करतात, पण या बदल्यात फुलांकडून मध घेतात. बी-ऑर्किडवर बसणाऱ्या माशीला मात्र मधही मिळत नाही आणि मादीही. उलट परागीभवन केल्याच्या बदल्यात त्यांच्या पदरी चक्क फसवणूक येते. तर असे हे फसविणारे आॉर्किड येऊरच्या जंगलात सध्या पाहायला मिळते.

येऊरच्या जंगलात सध्या बी-ऑर्किड पाहायला मिळतात. या वैशिष्टय़पूर्ण फुलाचे निरीक्षण करण्यासाठी येत्या रविवार, ७ जून रोजी मेधा कारखानीस यांनी निसर्ग भ्रमण आयोजित केले आहे. या सफरीत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. संपर्क- ९८२०१०१८६९.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Different animal and tree species in thane city forest

ताज्या बातम्या