पाच तालुक्यांमध्ये ४० महिला प्रतिनिधींची नेमणूक; डीजी-पे उपकरणांचे वाटप

ठाणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचे बँकेचे व्यवहार ऑनलाइन व्हावेत यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नतीच्या उमेद अभियानाअंतर्गत बीसी सखी म्हणजेच महिला बँक प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या महिला बँक प्रतिनिधी गावोगावी जाऊन आधुनिक उपकरणाद्वारे नागरिकांचे बँकेसंदर्भातील व्यवहार करणार आहेत. यासाठी त्यांना डीजी-पे या आधुनिक उपकरणांचे वाटपदेखील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये एकूण ४० बीसी सखींची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची खासकरून बचत गटांतील महिलांची बँकेत जाण्यासाठीची पायपीट काही अंशी वाचणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचे बँकेचे व्यवहार सुरळीत व्हावेत याकरिता उमेद अभियानाअंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मागील काही वर्षांपासून अंबरनाथ, कल्याण, शहापूर, भिवंडी आणि मुरबाड या तालुक्यांत बचत गटांशी निगडित असलेल्या महिलांची आणि ग्रामीण भागातील नागरिकांची बँकेशी संबंधित कामे सोपी व्हावीत म्हणून उमेद अभियानाच्या अंतर्गतच तालुक्यांतील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण २६ बँक सखींची नेमणूक करण्यात आली आहे. या बँक सखींमार्फत नागरिकांना नवीन खाते उघडणे, बचत गटांना कर्ज मिळवून देणे त्याचबरोबर इतर कागदोपत्री असणारी कामे यांच्यामार्फत केली जात आहेत. या बँक सखींनी लघुउद्योग सुरूकरण्यासाठी मागील वर्षभरात शेकडो बचत गटांना लाखो रुपयांचे कर्ज मिळवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागांतील महिलांचे आणि इतर नागरिकांचे बँकेचे व्यवहार अधिक सोपे आणि घरबसल्या व्हावेत याकरिता उमेदअंतर्गत महिला बँक प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या महिला प्रतिनिधींना पैशांची देवाणघेवाण नोंदीचे काम करणारे डीजी-पे नावाचे आधुनिक उपकरण देण्यात आले आहे.

गावातील नागरिकांना बँकेत पैसे जमा करायचे असल्यास या प्रतिनिधींकडे जमा करून त्यांना प्रतिनिधींमार्फत जागीच त्याची पोचपावती दिली जाणार आहे. तसेच नागरिकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढायचे असल्यास या प्रतिनिधींकडून नागरिकांना पैसे दिले जाणार असून त्याचीदेखील पावती दिली जाणार आहे. या सर्व व्यवहाराची नोंद डीजी-पे या उपकरणाद्वारे ठेवण्यात येणार आहे. या सर्व महिला बँक प्रतिनिधी त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये गावोगावी जाऊन ही सेवा देणार आहेत. बँक प्रतिनिधी म्हणून किमान बारावी पास असलेल्या महिलांची यात निवड करण्यात आली आहे. गावोगावी जाऊन हे सर्व व्यवहार कसे करावेत याकरिता एनएमआरएलतर्फे या महिलांना दहा ते पंधरा दिवस याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहेत. या प्रतिनिधींना मानधन म्हणून महिन्याअखेरीस त्यांनी केलेल्या प्रत्येक व्यवहारामागे एक ठरावीक रक्कम देण्यात येणार आहे. या बीसी सखी ग्रामीण भागातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या आर्थिक व्यवहारांच्या योग्य पद्धतींबाबत मार्गदर्शनही करणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आणि बचत गटांशी निगडित असलेल्या महिलांचे व्यवहार अधिक सोयीस्कर व्हावेत याकरिता बीसी सखींची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना बँक व्यवहारांच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. उमेदअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक बीसी सखी नेमण्याचे नियोजन सुरू आहे.

– सारिका भोसले, जिल्हा अभियान व्यवस्थापक, ठाणे</strong>