रवि जाधव,चित्रपट दिग्दर्शक
माझ्यासाठी वाचन म्हणजे ज्ञान मिळविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. वाचनाने तुमच्यापुढे ज्ञानाचा खजिनाच खुला होतो. विविध विषयांच्या पुस्तकांच्या वाचनाने तुम्ही समृद्ध होत असता. जितके अधिक तुम्ही वाचता, तितके वैचारिकदृष्टय़ा समृद्ध होता, असे मला वाटते. पाठय़पुस्तकातील धडे हे माझे पहिले वाचन. तिथे लागलेली गोडी आताही कायम आहे.
शाळेत एखाद्या लेखकाचा धडा किंवा कविता आवडल्यावर मी त्या लेखकाच्या पुस्तकांची माहिती करून घ्यायचो आणि ती पुस्तके ग्रंथालयातून आणून वाचायचो. पु.ल.देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. त्यांनी लिहिलेली ‘असामी आसामी, गोळाबेरीज, व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ, अघळ पघळ, पुरचुंडी’ अशी अनेक पुस्तके मी लहानपणीच वाचली आहेत. पु.लं.च्या बाबतीत मला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, प्रत्येक गोष्टीच्या शेवटी आपण ही गोष्ट का सांगितली याचे सार पु.लं. सांगतात. त्यामुळे ती गोष्ट पूर्णपणे कळण्यास आपल्याला मदत होते. बालकवींच्या कविताही मला वाचायला खूप आवडायच्या. लहानपणी मी डोंबिवलीत राहत होतो. त्यावेळी तेथे बाबासाहेब पुरंदरेंचं शिवाजी महाराजांवर एक व्याख्यान झाले होते. ते व्याख्यान ऐकून पुरंदरेंचे शिवचरित्र मी वाचले. विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती, रणांगण, संभाजी’, शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय, छावा, युगंधर’ यासारख्या कादंबऱ्याही मी वाचल्या आहेत. त्याशिवाय व.पु.काळे यांची, ‘वपुर्झा, रंगपंचमी, झोपलेला, पार्टनर’ अशी अनेक पुस्तके मी वाचली आहेत. व.पु.काळे यांची पुस्तके वाचण्यामागचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या पुस्तकातील चारोळ्या. काही परिच्छेद आम्ही वहीत लिहून ठेवायचो. त्या चारोळ्यांवरून मित्रांसमोर आपली कॉलर टाईट करायचो. चारचौघात भाव खायला त्यांचा उपयोग व्हायचा. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘बेबंदशाही’ ही नाटके, शिवकालीन साहित्य, माईन काम्फ ही पुस्तकेही मी शालेय वयात वाचली आहेत. महाविद्यालयीन वयात म्हणजे साधारणत: बारावीत शिकत असताना गूढकथा वाचण्याची माझ्यात आवड निर्माण झाली. रत्नाकर मतकरी लिखित ‘दुभंग’, ‘अरण्यक’, ‘साटेलोटे’ या गूढकथा मी वाचल्या आहेत. पिंगळावेळ, सांजशकुन, हिरवे रावे ही जी.ए. कुलकर्णी यांची पुस्तकेसुद्धा मी आवडीने वाचली आहेत. महाविद्यालयीन वयात माझ्या पुस्तक वाचनाचा वेग खूप चांगला होता. मी एक ते दोन दिवसात एक पुस्तक वाचून पूर्ण करायचो. बारावीनंतर दहा ते पंधरा वर्षे दैनंदिन व्यापामुळे माझे वाचन कमी होत होत कधी बंद झाले कळलेच नाही. २००४ ला मॉस्कोला जाताना मी सोबत म्हणून काही पुस्तके घेऊन गेलो होतो. त्यातील बहुतेक पुस्तके लोकसंगीताची होती आणि त्यामुळेच मला लोकसंगीताबद्दल ओढ निर्माण झाली. संदेश भंडारे यांचे ‘तमाशा’, अण्णाभाऊ साठेंची काही पुस्तके, डॉ. आनंद यादवांचे ‘झोंबी’ आणि ‘नटरंग’ ही पुस्तकेही मी याच काळात वाचली. नाटक, कथा, कादंबऱ्या किंवा इतिहासाच्या पुस्तकांबरोबर मी चित्रपट आणि नाटक यातील बारकावे सांगणारी पुस्तकेही वाचली. प्रभाकर पेंढारकरांचे ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’, सुबोध जावडेकरांचे ‘अचंब्याच्या गोष्टी’, गणेश मतकरी यांचे ‘मॉडर्न’, जयवंत दळवी यांचे ‘वेडगळ’, ‘स्वरगंधर्व’ सुधीर फडके, गो.नि.दांडेकर यांचे ‘जैत रे जैत’ ही पुस्तकेसुद्धा मी वाचली आहेत. मला वाचक म्हणून पुस्तके वाचायला आवडतातच, परंतु एक डिझायनर म्हणून मला पुस्तकाची रचनाही पाहायला आवडते. कधी कधी तर मी चांगली डिझाइन्स असलेली पुस्तके विकत घेतो. मला फिल्म फेस्टिवलचा कॅटलॉगही वाचायला आवडतो. या वाचनामुळे आधीचे चित्रपट कसे होते आणि आजचे चित्रपट कसे आहेत हे कळते. चित्रपटात काळानुसार आणि लोकांच्या अपेक्षेनुसार काय बदल झाले, हेसुद्धा समजून घेता येते. रवींद्रनाथ टागोर यांचं ‘पोरवय’, अभिराम भडकमकर यांचं ‘चुडैल’, कुसुमाग्रज लिखित ‘विशाखा’, किशोरीताई अमोणकरांचे आत्मचरित्र मी वाचले आहे. ‘कमला’, ‘अशी पाखरे येती’, ‘माझी बहीण’ असे विजय तेंडुलकरांचे सगळे साहित्य, गो.नि.दांडेकर लिखित ‘शिवकाल’; ‘भटके पक्षी’, ‘चोरी’, ‘बोलगाणी’ अशी मंगेश पाडगावकरांच्या कवितांची पुस्तके मी वाचली आहेत. माझ्या पुस्तकांचे शेअरिंग हे ग्रंथालयासोबत होते. मी पुस्तके विकत आणतो आणि माझी वाचून झाल्यावर ती ग्रंथालयास देतो. सध्या माझ्या घरात आणि कार्यालयामध्ये हजार ते दीड हजार पुस्तके आहेत. यशवंत सिंह लिखित ‘स्वर्ग’, म.ल.वराडपांडे यांचे ‘कोल्हटकर आणि हिराबाई’, संदीप खरे यांचं ‘मौनाची भाषांतरे’ ही पुस्तके मी वाचली आहेत. मधु मंगेश कर्णिक यांचे ‘माहीमची खाडी’, अनिल सोनार यांचे ‘बिन पराचा कावळा’, अशोक बागवेंच्या कविता आवडल्या. चिन्ह पब्लिकेशनची पेंटर्स आणि आर्टिस्टसाठी असणारी पुस्तके, दिवाळी अंक मला वाचायला आवडतात. सध्या मी सुबोध भावेंचे ‘घेई छंद’ हे पुस्तक वाचतो आहे. सध्याची इंटरनेटवरचे वाचन ही एक चांगलीच पद्धत आहे. पुस्तक नसताना कधीही कुठेही वाचू शकता. मला हे ऑनलाईन वाचन अजूनतरी आवडत नाही. कारण नवीन पुस्तक हातात घेऊन वाचनाची जी मजा असते, ती ऑनलाइनमध्ये मिळत नाही.