ठाणे शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून दिव्यांग स्टॉलची जागा बदलण्यासाठी मागणी करूनही ती मान्य होत नसल्याचा आरोप करत सोमवारी दिव्यांग संघटनांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर महापालिकेचे श्राद्ध घातले. तसेच पिंडदान करून अन्नदानही केले. ठाणे महापालिकेकडून दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल देण्यात आले आहेत. हे स्टॉल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टॉल ठेवण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरण योजनेस खिळ बसत आहे.
हेही वाचा >>> भंडार्ली कचराभूमीचा वाद पेटला; मनसे आमदारासह ग्रामस्थांनी घेतली आयुक्तांची भेट
स्टॉल योग्य ठिकाणी नसल्याने उत्पन्न कमी, खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. या स्टॉल धारक दिव्यांगांना त्यांचा व्यवसाय सुकर व्हावा अशा ठिकाणी स्टॉल द्यावेत, अशी मागणी सोमवारी दिव्यांग अत्याचार निर्मूलन समितीने केली. महापालिकेला यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्यांच्याकडून दिव्यांगांच्या प्रश्नावर टाळाटाळ केली जात आहे, असा आरोपही समितीने केला. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर केशवपन करून महापालिकेचे श्राद्ध घातले. तसेच मंगळवारपासून समिती बेमुदत उपोषण करणार असल्याचेही स्पष्ट केले.