निवडणुकांच्या तोंडावर भूमिका बदलाची चर्चा; नेत्यांकडून पक्षाशी संबंध नसल्याचा दावा

ठाणे: उत्तर भारतीयांना मारहाण करत छठपूजेला कडाडून विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही वर्षांपासून घेतली जात असतानाच, यंदा ठाण्यात मनसेचे शहराध्यक्षांसह काही पदाधिकारी छठपूजेला जातीने उपस्थित राहिल्याने पक्षाच्या बदललेल्या भूमिकेची चर्चा येथील राजकीय वतुर्ळात रंगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच परप्रांतीयांविरोधात पक्षाची भूमिका राहिली आहे. महाराष्ट्रात मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी पक्षाने अनेक आंदोलने केली आहेत. यातूनच रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांवर पक्षाच्या नेत्यांकडून हल्ला करण्याचे प्रकार घडले होते. तसेच शहरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातही मनसेकडून आंदोलने करण्यात आली आहेत. परप्रांतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाच्या नेत्यांवर टीकाही झाली होती. तरीही नेत्यांकडून परप्रांतीयांविरोधाचा सूर कायम होता.

उत्तर भारतीयांकडून मुंबई आणि ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात छठपूजेचे आयोजन करण्यात येते. या पूजेलाही मनसेने कडाडून विरोध केला होता आणि या पूजेवरून वादाचे प्रसंगही उद्भवले होते. असे असतानाच यंदा ठाण्यात मात्र वेगळे चित्र दिसून आले असून मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह काही पदाधिकारी छठपूजेला उपस्थित राहिल्याचे दिसून आले. या पूजेला परिवारासह उपस्थित राहिल्याचे छायाचित्रही त्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केले आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. परप्रांतीयांविरोधातील भूमिकेचा मनसेला यापूर्वी काही प्रभागांमध्ये फटका बसला असून त्यातून भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

दरम्यान, निमंत्रण असल्यामुळे परिवारासह छटपूजेला गेल्याचे सांगत ही वैयक्तिक बाब आहे, याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असा दावा मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.

सामजमाध्यमांवरील पोस्ट

छठपूजेच्या पवित्र दिवशी आपल्या उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे ठाणे शहर सचिव नीलेश चव्हाण यांनी कोलशेत गणेश विसर्जन घाट येथे भेट दिली आणि सर्व उत्तर भारतीय नागरिकांसोबत छठपूजा करून सुखी, आरोग्यदायी आनंदी, जीवनासाठी प्रार्थना केली. तसेच सर्व आयोजक तसेच नागरिकांचे मन:पूर्वक आभार मानले. या प्रसंगी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि त्यांच्या पत्नी सायली मोरे यांनीसुद्धा छठपूजा करून दर्शन घेतले, अशा स्वरूपाची पोस्ट मनसेच्या नेत्यांनी टाकली असून त्याचबरोबर पूजा करतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.

तीन वर्षांपूर्वी छठपूजेला गेलो होतो. त्यावेळेस त्यांचे पूजेचे आयोजनही आवडले होते. परिवारासोबतही ही पूजा करतानाचे सुंदर चित्र दिसून आले. त्यावेळेस त्यांनी पुढच्या वर्षी परिवारासह पूजेला येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु करोनाकाळामुळे पूजेला जाऊ शकलो नव्हतो. यंदा परिवारासह पूजेसाठी गेले होतो. ही वैयक्तिक बाब असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही.  -रवींद्र मोरे, शहराध्यक्ष, ठाणे शहर