कल्याण – पालिका आयुक्तांपासून इतर अधिकाऱ्यांना सांगुनी कल्याण पूर्वेतील विविध रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे पालिका अधिकाऱ्यांकडून केली जात नव्हती. स्थानिक आमदारही याविषयी काही आवाज उठवत नसल्याने नागरिक कुरकुर करत होते. अखेर शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी खड्डे स्पर्धा आयोजित करून या खड्ड्यांच्या प्रतिमा गिनिज बुक आणि ऑस्कर पुस्कारासाठी पाठविण्याची तयारी केली होती.

महेश गायकवाड यांनी सुरू केलेल्या खड्डे स्पर्धेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळू लागला. जो तरूण किंवा नागरिक तीस ते एक मिनिटात खड्ड्यांचे चलतचित्र किंवा दृश्यचित्रण महेश गायकवाड यांच्या कार्यालयात काही क्षणात आणून देईल त्याचा यथोयोग्य सन्मान महेश यांच्याकडून केला जात होता. या सगळ्या प्रकारामुळे पालिकेचे धिंडवडे आणि स्थानिक आमदार खड्डे विषयावर काही करत नसल्याचा संदेश कल्याण पूर्व भागातील नागरिकांमध्ये जात होता.

महेश गायकवाड यांनी खड्डे स्पर्धा सुरू करताच अखेर जागरूक झालेल्या कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाऊस कमी झाल्याने कल्याण पूर्वेतील सर्व भागातील खड्डे तात्काळ भरण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा आदेश असल्याने तो आदेश शिरसांवद्य मानून अधिकाऱ्यांनी मंगळवार, बुधवारपासून कल्याण पूर्वेतील खड्डे भरणीची कामे सुरू केली आहेत. स्वता आमदार गायकवाड या खड्डे भरणीच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून कामे करून घेत आहेत.

आपण एक महिन्यापासून आयुक्त अभिनव गोयल आणि इतर अधिकाऱ्यांना घेऊन कल्याण पूर्वेतील खराब रस्ते, खड्ड्यांची परिस्थिती दाखवली. त्यावेळी आयुक्तांनी ही कामे तातडीने करण्याचे आश्वासन महेश गायकवाड यांना दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र, आमदार सुलभा गायकवाड यांच्या आदेशावरून तात्काळ पालिका अधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व भागातील विविध भागातील खड्डे भरणीची कामे सुरू केल्याने संतप्त झालेल्या महेश गायकवाड यांनी समाज माध्यमांतून ‘मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर’. अशी गत कल्याण पूर्वेची झाली आहे. कल्याण पूर्वेतील खड्डे भरण्यासाठी समाजसेवकांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. आंदोलने केली. आता कामे सुरू झाल्यावर या कामांचे श्रेय घेण्यासाठी भलतेच महाशय पुढे आले आहेत. हा सगळा प्रकार कल्याण पूर्वेचे लोक ओळखतात. त्यांना नवीन काही सांगण्याची गरज नाही,’ अशी टीका कल्याण पूर्वेतील एका लोकप्रतिनिधीवर नाव न घेता केली आहे.

त्यामुळे येत्या काळात खड्डे, रस्ते आणि आगामी पालिका निवडणुकीचा विचार करता कल्याण पूर्वेत स्थानिक भाजप आमदार विरूध्द माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. दोन वर्षापूर्वी आमदार सुलभा गायकवाड यांचे पती माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर जमीन प्रकरणावरून गोळीबार केला होता. त्यामुळे दोन गायकवाडांमध्ये गेल्या दोन वर्षापासून रस्सीखेच सुरू आहे.