ठाणे : ठाण्यातील दिवंगत भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंटवरून सातत्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर टीका केली जात असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) समर्थकांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलिसांनी चंद्रेश यादव या तरुणाला ताब्यात घेतले असून यावरून शिंदेंची शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये वाद पेटला. यादव याला ताब्यात घेतल्यानंतरही विलास कांबळे यांच्या नावाने वादग्रस्त पोस्ट्स सुरूच असल्याने या प्रकरणाचा गोंधळ वाढला आहे.
ठाणे महापालिका निवडणुक येत्या काही महिन्यात होणार असून त्याआधीच शहरातील वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात शिंदेंची शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये वाद पेटला. ठाण्यातील दिवंगत भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंटवरून सातत्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर टीका केली जात आहे.
अशातच एका नागरिकाच्या मदतीने शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी इंदिरानगर भागात राहणाऱ्या चंद्रेश यादव या तरुणाविरोधात संशयावरून श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी चंद्रेशला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. त्यावेळी शिवसेेनेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, दिलीप बारटक्के यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. याचदरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैय्या हे पोलिस ठाण्यात गेले आणि याप्रकरणाची चौकशी करूनच चंद्रेशवर कारवाई करा अशी मागणी केली.
यानंतर शिवसैनिकांनी सरैय्या यांना धक्काबुक्की केली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संदर्भात श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता, तक्रारदाराने तक्रारी संशय व्यक्त केल्याने चंद्रेशला ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमित सरैय्या यांचे म्हणणे
पोलीस ठाण्यात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गेले असता धक्काबुक्की झाल्याचा आरोप अमित सरैय्या यांनी केला. चंद्रेश यादवला ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच “टायगर अभी जिंदा है” अशी पोस्ट दिवंगत भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने फेसबुक अकाउंटवरून टाकण्यात आली होती. जर यादवनेच अकाउंट चालवले असते, तर पोलिसांच्या ताब्यात असतानाही पोस्ट येणे शक्य नाही, असे अमित सरैय्या यांनी सांगितले. तसेच श्रीनगर पोलीस ठाणे हे शिवसेनेची शाखा बनले असा आरोप करत स्थानिक शिवसैनिकांच्या सांगण्यावरून निर्दोष चंद्रेश यादवला ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य सुत्रधार शोधा
भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून पोस्ट टाकण्यात येत आहेत. यात आमच्या पक्षाच्या काही नगरसेवकांविरोधात पोस्ट टाकल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच कारवाई होत नव्हती. याचप्रकरणातील एका तरुणाने माहिती दिल्यानंतर त्याच्या मार्फत श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्याआधारे पोलिसांनी संशायवरून एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. असे असले तरी याप्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य सुत्रधार शोधावा, असे शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.