रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला दहा दिवस बंद
किशोर कोकणे
ठाणे : करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या नियमानुसार एखाद्या इमारतीत करोनाबाधित आढळल्यास रुग्ण राहात असलेला मजला दहा दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या मजल्यावरील आणि खालील मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांचीही करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. एकीकडे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सात दिवस गृहविलगीकरण करण्यास सांगितले असताना प्रतिबंधित क्षेत्राबाबत कडक निर्बंध का, असा प्रश्न गृहसंकुलांतील नागरिक विचारत आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात ६,५०० गृहनिर्माण संस्था आहेत. करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने गुरुवारी ठाणे महापालिकेने सर्वच गृहनिर्माण संस्थांसाठी नियमावली काढली आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्यास तो संपूर्ण मजला प्रतिबंधित करण्यात येणार आहे. त्या मजल्यावरील नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असून मजल्याच्या वरील व त्याखालील मजल्यावर राहणाऱ्या सर्व रहिवाशांची प्रतिजन चाचणी पाच ते सात दिवसांत करण्यात येणार असल्याचे या नियमावलीत म्हटले आहे. तर इमारतीमध्ये १० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारतीतील रहिवाशांची प्रतिजन चाचणी केली जाणार आहे. दहापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत प्रतिबंधित केली जाणार आहे.
या नियमावलीच्या प्रती गृहसंकुल पदाधिकाऱ्यांच्या हाती पडल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव जरी वेगाने पसरत असला तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एखाद्या मजल्यावर एखादा करोनाबाधित आढळून आला तर त्याचा परिणाम त्या मजल्यावर राहणाऱ्या इतर नागरिकांनी का सहन करावा, असे गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांपेक्षाही सध्याचे नियम कठोर आहेत. रुग्ण आढळल्यास महापालिका करोना चाचणी करणार असल्याचे म्हणत आहे, परंतु महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नाही. त्यामुळे निर्णयाविरोधात आम्ही महापालिकेकडे पत्रव्यवहार करणार आहोत, असे ठाणे जिल्हा को. हौ. फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी सांगितले.
नियमांचा अडसर
नौपाडा तसेच वागळे इस्टेट, लोकमान्यनगर भागात अनेक इमारती या चार ते पाच मजल्याच्या आहेत. यातील बऱ्याचशा इमारतींमध्ये उद्वाहक नाही. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एखादा रुग्ण आढळल्यास तो मजला प्रतिबंधित केल्यास वरच्या मजल्यावर राहणारे इतर नागरिक घराबाहेर पडणार कसे, असा प्रश्न गृहनिर्माण संस्थांच्या संघटनांनी केला आहे.
नोकरीधंद्याचे काय?
मुंबई महानगर प्रदेशात अद्यापही खासगी कंपन्यांची कामे सुरू आहेत. एखादी इमारत सील झाली तर ज्यांना कोणतेही लक्षण नाही अशांनी घराबाहेर कसे पडायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. चाचण्या करा असा आग्रह महापालिका धरत असली तरी आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल येण्यास दीड ते दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा वेळी अहवाल येण्याची वाट पाहात घरी बसण्याशिवाय लक्षणे नसलेल्या कुटुंबांनाही पर्याय राहाणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात करोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसारच ठाणे महापालिकेने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
– संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका.