ठाणे – दिवाळी सणच नव्हे इतर कुठल्याही सणांना सोन्याच्या दागिन्यांची तसेच नाण्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते असा आजवरचा अनुभव आहे. गुरुपुष्यामृत दसरा, दिवाळी हे सण तर सोने खरेदीसाठीचे उत्तम मुहूर्त मानले जातात. मात्र, जागतिक बाजारपेठेत चांदीच किंमत सतत वाढू लागल्याने यंदा दिवाळीत सोन्यापेक्षा चांदी खरेदीलाच प्राधान्य मिळाल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षी दिवाळीच्या कालावधीत सोने -चांदीच्या दरात वाढ झाल्याने सोने -चांदी खरेदीसाठी ग्राहक हात आकडता घेतील असे वाटले होते. परंतू, प्रत्यक्षात तसे झाले नाही, यंदाही ग्राहकांचा सोने -चांदी खरेदीला चांगलाच उत्साह दिसून आला. धनत्रयोदशी आणि दीपावली पाडव्याच्या दिवशी सर्वाधिक सोने आणि चांदीची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या काही दिवस अगोदर सोने १ लाख ३५ हजार रुपये प्रति तोळा पर्यंत तर, चांदी १ लाख ७८ हजार रुपयांवर पोहोचले होते. त्यामुळे दिवाळीच्या दिवसात सोने चांदी खरेदी कसे करायचे असा प्रश्न सर्वांपुढे निर्माण झाला होता. परंतू, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सोने १ लाख ३२ हजार तर, चांदी १ लाख ७० हजार रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ठाणे शहरातील सर्वाधिक सोने-चांदीची दुकाने ग्राहकांनी फुललेली दिसून आली. तर, ग्राहकांना खूश करण्यासाठी सराफ दुकानदारांकडून देखील सोने -चांदी खरेदीवर दिवाळी निमित्त ग्राहकांना छोटीसी भेट वस्तू दिली जात होती.
ठाणे येथील शिरवाडकर सराफचे अजित पद्माकर शिरवाडकर यांनी सांगितले की, यंदा सोन्यापेक्षा चांदीच्या वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे अनेकांनी पसंत केले. चांदीची अंगठी, साखळीसह नाणी तसेच दिवा,समई, वाटी अशा वस्तू ग्राहकांनी सर्वाधिक खरेदी केल्या आहेत. यंदाच्या वर्षी चांदीच्या वस्तूंची सर्वाधिक खरेदी झाली असली तरी, सोने खरेदीला देखील नागरिकांचा उत्साह दिसून येत होता. धनत्रयोदशी आणि पाडव्याच्या दिवशी सोने-चांदीची सर्वाधिक खरेदी झाली, असे ठाणे येथील यशवंत विठ्ठल मराठे ज्वेलर्स चे मंदार मराठे यांनी सांगितले.
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे यादिवशी सोने चांदी खरेदीला पसंती दिली जाते. परंतू, यंदा दसऱ्यापेक्षा दिवाळीच्या कालावधीत सोने चांदीची सर्वाधिक खरेदी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत सोन्याचे दर दुप्पट झाले असले तरी ग्राहकांचा मात्र, सोने खरेदीला उत्साह दिसून आला. अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केली तर, काहींनी लग्न कार्यासाठी खरेदी केली, अशी माहिती ठाण्यातील एका सराफ दुकानदाराने दिली.
