Diwali news 2025, Thane News : ठाणे : दिवाळी सणानिमित्त घरात दिवाळी फराळ बनविण्यात येतो. मात्र, नोकरीमुळे अनेकांना घरी फराळ बनविणे शक्य होत नाही. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त कपडे, दागिने, फटाके यासह दिवाळी फराळची खरेदी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे.नेमकी हीच बाब लक्षात घेऊन महिला विकास परिवाराने गेली सात वर्षे महिला बचत गटांतील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्रे चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत आठ स्टॉलवर तब्बल १५ लाखांची उलाढाल झाली आहे.
महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडलेले असून, शेकडो महिला या परिवाराच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांत सहभागी होतात. या संस्थेने गेल्या सात वर्षांपासून दिवाळी फराळ विक्री केंद्रे चालवून सुमारे तीन हजार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत एकूण ८० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याची नोंद आहे. महिला विकास परिवार हा केवळ फराळ विक्रीपुरता मर्यादित नाही, तर महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा सामाजिक उपक्रम आहे. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा आमचा उद्देश असून नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे, असे संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
आठ ठिकाणी फराळ विक्री केंद्र
या वर्षी ठाण्यात आठ ठिकाणी फराळ विक्री केंद्र उभारण्यात आली. सुमारे ४०० महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. काही महिलांनी फराळ तयार केला, काहींनी पॅकिंगची जबाबदारी घेतली, तर काहींनी विक्री केंद्रावर काम केले. दर्जेदार आणि घरगुती फराळ वाजवी दरात उपलब्ध झाल्याने ठाणेकर नागरिकांनी या केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला, अशी माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली.
केंद्रांमधून १५ लाख रुपयांची उलाढाल
हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्याने नागरिकांनी केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला. दिवाळीच्या पाच दिवसांत या केंद्रांमधून १५ लाख रुपयांची उलाढाल झाली. विक्रीतून झालेला नफा महिलांमध्ये वाटण्यात आला असून, प्रत्येक महिलेला १४ ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या उपक्रमामुळे महिलांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली, असे आमदार केळकर यांनी सांगितले.
