लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण – एका मालकाच्या पाळीव कोंबडीचा भटक्या कुत्र्याने पाठलाग करून तिला जायबंदी करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कोंबडीच्या मालकाने एका श्वान प्रेमीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार येथे गुरूवारी घडला.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार दीपक दवे हा कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. तो प्राणीप्रेमी आहे. दिवसभराचे काम उरकल्यानंतर दीपक परिसरातील घरांमध्ये शिल्लक राहिलेले अन्न जमा करून तो ते रात्रीच्या वेळेत १०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना खाण्यास देतो.

आणखी वाचा-ठाणे- दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

दीपकमुळे भटकी कुत्री आपल्या भागात अधिक प्रमाणात वाढली आहेत, असा आरोप करत दोन महिन्यापूर्वी दीपकने सुरू ठेवलेला प्रकार थांबवावा म्हणून त्याच्या भागात राहणाऱ्या किरण बांगर रहिवाशाने दीपकला मारण्याची धमकी दिली होती. बांगर यांचा दीपकवर राग होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने बांगर यांच्या घर परिसरात फिरणाऱ्या पाळीव कोंबडीचा पाठलाग केला. त्यांच्या कोंबडीला जायबंदी केली. या प्रकाराचा बांगर यांना राग आला. दीपकने पाळलेल्या कुत्र्यांमुळे आपली पाळीव कोंबडी जायबंदी झाली आहे, असा आरोप करत किरण बांगर दीपकच्या घरी आले. त्याला बेदम मारहाण केली. आपला भटक्या कुत्र्याशी खाऊ देण्या व्यतिरिक्त काही संबंध नाही, असे दीपकने सांगण्याचा प्रयत्न केला. बांगर यांनी त्याचे काही ऐकले नाही. आपणास नाहक मारहाण केल्याने दीपक यांनी बांगर यांच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.