धुळ्यातील आदिवासी भागातून गांजा खरेदी करून तो शहरी भागात विक्री साठी आणणाऱ्या तसेच तो खरेदी करणाऱ्या टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या या टोळीतील आनंद शंकर देवकर या आरोपींकडून ३ लाख १० हजार ५०० रुपयाचा गांजा पोलिसानी जप्त केला आहे. हा आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांजा पुरवत होता. डोंबिवली पूर्वेकडील रामनगर रस्ता येथे राहणाऱ्या आनंद शंकर देवकर आणि धुळ्यातील रेहमल पावरा, संदीप पावरा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

यातील दिनेश शिवाजी पावरा हा मुख्य आरोपी फरार आहे.  एक व्यक्ती अमली पदार्थ घेऊन डोंबिवलीत येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हॉटेल शिवमच्या बाजूस आरोपी पदार्थांची विक्री करणार असल्याचेही समजले होते. त्यानुसार पोलीसानी सापळा रचला.

पोलिसांना एक व्यक्ती मोकळ्या मैदानात दोन गोण्या घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात  घेतले असता त्याच्याकडे २० किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. अधिक तपास केल्यावर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आदिवासी भागातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे निदर्शनास आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशा पद्धतीने कोणी गांजा विक्री करताना किंवा गांजा सेवन करताना आढळून आले तर पोलिसांकडे संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी केले आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे,  पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उलगडला असून अधिक तपास करत आहेत.