डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील छेडा रस्त्यावर पथदिवे दुरुस्तीचे काम करणाऱ्या टेम्पो चालकाने एका ७५ वर्षाच्या वृध्देला मंगळवारी संध्याकाळी जोराची ठोकर दिली. या धडकेत वृध्द महिला रस्त्यावर कोसळल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली.
तृप्ती म्हसकर (७५) असे टेम्पो अपघातात मरण पावलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. डोंबिवलीत पथदिव्यांची दुरुस्ती करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने एका खासगी ठेकेदाराला काम दिले आहे. या ठेकेदाराचे वाहन दिवसभर शहराच्या विविध भागात बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी कामगार घेऊन फिरत असते. डोंबिवली पूर्व भागातील विविध भागातील पथदिव्यांची दुरुस्ती करून टेम्पो कामगार घेऊन छेडा रस्त्याने मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता चालला होता.
या वेळेत तृप्ती म्हसकर या रस्त्याच्या डाव्या बाजुने बाजारपेठेत चालल्या होत्या. विद्युत ठेकेदाराचा टेम्पो चालक रस्त्याने सरळ जात असताना अचानक टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक तृप्ती म्हसकर यांना बसली. या धडकेत त्या जमिनीवर कोसळल्या. पादचाऱ्यांनी ओरडा केल्यानंतर आणि टेम्पोच्या धडकेत महिला रस्त्यावर पडल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने तात्काळ ब्रेक दाबून गाडी जागीच थांबवली. पादचाऱ्यांनी तात्काळ वृध्द महिलेच्या कुटुंबीयांना संपर्क केला. त्यांना तातडीने घटनास्थळी बोलवले. तृप्ती म्हसकर यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले.
टेम्पोची जोराची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या तृप्ती म्हसकर यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. रामनगर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही घटना पाहणाऱ्यांची साक्ष घेतली. टेम्पोसह टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर चालकाला अटक करण्यात आली.
डोंबिवली शहरात अलीकडे मालवाहू टेम्पो चालक, घरगुती खाद्य वस्तू घरपोच सेवा देणाऱ्या दुचाकी स्वारांची यांची सतत रेलचेल असते. हे वाहन चालक सुसाट वेगाने टेम्पो, दुचाकी चालवित असतात. एखाद्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की मग हे अपघात होतात. वाहतूक विभागाने अशा वाहन चालकांची कसून तपासणी करावी, अशी मागणी या अपघाताच्या निमित्ताने जोर धरू लागली आहे.