डोंबिवली- अहो काका, तुम्ही नेत असलेली गणेश मूर्ती ही आम्ही दोन महिन्यापूर्वीच नोंदणी केलेली आहे. आमची मूर्ती आम्हाला परत करा. असे सांगूनही डोंबिवलीतील आनंदी कला केंद्रातील एक गणेश भक्त दुसऱ्या भक्ताला गणेश मूर्ती देण्यास तयार नव्हता. आपण नोंदणी केलेली मूर्ती आपणास परत मिळत नाही पाहून गणपती कारखान्यात आलेला एक तरुण गणेश भक्त ढसाढसा रडायलाच लागला.

डोंबिवलीतील महात्मा फुले रोडवरील चिनार मैदाना जवळील आनंदी गणपती बनवण्याच्या कारखान्यातील गणेश मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे आणि त्यांचे २० कारागीर पळून गेले आहेत. अशी माहिती गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी गणेश भक्तांना समजली. प्रत्येक गणेश भक्त कारखान्यात येऊन आपली गणपतीची मूर्ती कारखान्यात दिसत नाही पाहून अस्वस्थ झाला.गणेशोत्सव उद्यावर आला आहे. आता आपण काय करायचे असा प्रश्न सुमारे साडेपाचशेहून अधिक गणेश भक्तांना पडला. मूर्तिकार तांबडे यांना मोबाईलवर संपर्क करूनही ते फोन बंद करून बसले होते. कारखान्यात एकही कारागीर उपस्थित नव्हता.

रात्री उशिरापर्यंत थांबूनही गणेश मूर्तिकार तांबडे गणपती कारखान्यात येत नाहीत. हे पाहून आनंदी कला केंद्रात गणपती मूर्तीची नोंदणी केलेल्या गणेश भक्तांनी कारखान्यात रंगकाम काम करून प्राणप्रतिष्ठेसाठी तयार असलेल्या मिळेल त्या गणपती मूर्ती उचलून घरी घेऊन जाण्यास सुरुवात केली. मूर्ती नेतांना ती गणपतीची मूर्ती कोणाच्या नावाची आहे याची पर्वा गणेश भक्तांनी केली नाही.

तरुण रडायला लागला

असाच एक तरुण गणेश भक्त आनंदी केंद्रात आल्यावर आपली गणपतीची मूर्ती शोधू लागला. त्याला आपण दोन महिन्यापूर्वी नोंदणी केलेली गणपतीची रंगकाम करून तयार मूर्ती दुसराच गणेश भक्त घेऊन जात असल्याचे दिसले. या तरुणाने त्या गणेश भक्ताच्या मागे धावून अहो काका ती गणपती बाप्पाची मूर्ती आमची आहे. त्या मूर्तीवर आमच्या नावाची चिठ्ठी आहे. या मूर्तीचा फोटो आमच्या मोबाईलमधील गॅलरीमध्ये आहे. आमची मूर्ती आम्हाला परत करा, असे कळकळीची विनंती करून सांगू लागला. परंतु समोरचा गणेश भक्त त्या तरुणाचे काही ऐकण्यास तयार नव्हता. गणेश मूर्तिकार जागेवर नाही. तो पळून गेला आहे. गणपती कारखान्यात माझ्या मूर्तीचा पत्ता नाही. ही मूर्ती मी तुला का देऊ, असा प्रश्न दुसरा गणेश भक्त त्या तरुण गणेश भक्ताला करत होता.

गणपतीची मूर्ती तुमची आहे की आमची आहे या विषयावरून आनंदी कला केंद्रात दोन गणेश भक्तांमध्ये शाब्दिक रस्सीखेच सुरू होती. समोरचा गणेश भक्त तरुण गणेश भक्ताला मूर्तीचा ताबा देण्यास अजिबात तयार नव्हता.आपली मूर्ती आपणास मिळत नाही. आता ती दुसऱ्याच गणेश भक्त घेऊन जात आहे. आता उद्या काय करायचे. हे चित्र समोर दिसल्यावर कारखान्यात गणपती नेण्यासाठी आलेला तो तरुण गणेश भक्त कारखान्यात ढसाढसा रडायला लागला.

अखेर आपली गणपती मूर्ती घरी नेण्यासाठी आलेले राम म्हात्रे आणि लक्ष्मण म्हात्रे यांनी समोरच्या गणेश भक्ताची समजूत काढली. या गणेश मूर्तीवर त्या तरुणाच्या नावाची चिठ्ठी आहे. त्याच्या व्हॉट्सअॅपमध्ये गणपती मूर्तीचा फोटो आहे. मग तुम्ही ही मूर्ती का नेता. या तरुणाला दुखून तुम्ही मूर्ती घेत असाल तर ते योग्य आहे का असे प्रश्न राम आणि लक्ष्मण म्हात्रे यांनी गणेश भक्ताला केले. गणेश मूर्तीसाठी तुम्ही एका तरुणाला रडवता हे योग्य नाही असे सुनावले. अखेर त्या गणेश भक्ताने तरुणाची मूर्ती पुन्हा गणेश भक्ताच्या स्वाधीन केली. आणि त्यानंतर तो तरुण आपली गणपतीची मूर्ती घेऊन समाधानाने घरी निघून गेला.