डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, गोग्रासवाडी भागात एका पिसाळलेल्या श्वानाने १२ जणांना चावा घेतला. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पिसाळलेला श्वान पकडून नेण्यात यावा म्हणून पालिकेत अधिकाऱ्यांना तीन दिवस संपर्क करुनही प्रतिसाद मिळाल नाही, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या.

पूर्व भागातील पाथर्ली, गोग्रासवाडी भागात संचार असलेला एका श्वान पिसाळला. त्याने पादचाऱ्यांना चावे घेण्यास सुरुवात केली. अचानक श्वान चावू लागल्याने या भागात घबराट पसरली. माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे, तात्यासाहेब माने, अनिल ठक्कर यांनी पालिकेच्या प्रभागात, आरोग्य अधिकारी, श्वान पथकाला संपर्क केला. त्यांच्याकडून दोन दिवस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या भागात श्वानाचा संचार सुरू होता. अचानक तो पादचाऱ्याच्या अंगावर जाऊन चावा घेत होता. या प्रकाराने पाथर्ली, गोग्रोसवाडी भागात घबराट पसरली होती. या भागात अनेक शाळा आहेत. मुलांचे पालक घाबरले होते.

तिसऱ्या दिवशी श्वानाला पकडले –

दोन दिवसात भटक्या श्वानाने १२ जणांना चावा घेतला. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पालिकेने पहिल्याच दिवशी हा पिसाळलेला श्वान पकडून नेला असता तर पुढील घटना टळल्या असत्या, असे नीलेश म्हात्रे यांनी सांगितले. तिसऱ्या दिवशी पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सापळा लावून पिसाळलेल्या श्वानाला पकडले. त्याला कल्याण मधील पत्रीपूल येथील निर्बिजीकरण केंद्रात नेण्यात आले आहे.

भटका श्वान पटकन सापळ्यात अडकत नाही –

पालिका श्वान पथकातील कर्मचाऱ्याने सांगितले, श्वान पथकाला टिटवाळा, २७ गाव, डोंबिवली, कल्याण विभागातून श्वान पकडण्याच्या दिवसभरात अनेक तक्रारी येतात. त्या कामगिरीवर श्वान पथक गेलेले असते. भटका श्वान पटकन सापळ्यात अडकत नाही. त्यात वेळ जातो. पाथर्ली येथील तक्रार आल्यानंतर त्याच दिवशी त्या भागातील पिसाळलेला श्वान पकडून आणला, असे पथक प्रमखाने सांगितले.