डोंबिवली – मागील महिन्यात डोंबिवलीतील ठाकुरवाडी भागात राहत असलेल्या ६७ वर्षाच्या रिक्षा चालकाने आपल्या राहत्या घरात मानसिक तणावातून आत्महत्या केली होती. या आत्महत्येला जबाबदार धरून विष्णुनगर पोलिसांनी मोठागाव मधील मोटार वाहन चालक आकाश म्हात्रे यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्राॅसिटी) कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

मुंजाजी भोजाजी शेळके (६७) असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबीयांसमवेत ठाकुरवाडीत राहत होते. त्यांच्या रिक्षा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. याप्रकरणी मुंजाजी शेळके यांची सून ज्योती शेळके यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तपास करून हा गुन्हा दाखल केला आहे.

ज्योती शेळके यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सासरे मुंजाजी शेळके सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत डोंबिवली रेल्वे स्थानक भागात प्रवासी वाहतूक करायचे. गेल्या महिन्यात ते दिवसभर प्रवासी वाहतूक करत होते. रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान मुंजाजी शेळके यांच्या रिक्षचा धक्का डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव मधील आकाश म्हात्रे यांच्या वाहनाला मोठागाव भागात धक्का लागला. त्यामुळे आकाश यांच्या वाहनाची नासधूस झाली.

या घटनेनंतर आकाश यांनी मुंजाजी शेळके यांची रिक्षा ताब्यात घेतली. मोटारीच्या नासधूसप्रकरणी दहा हजार रूपयांची मागणी केली. त्यांना रात्री साडे नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत आकाश यांनी डांबून ठेवले. अचानक एवढे पैसे कोठुन आणायचे या चिंतेने मुंजाजी शेळके अस्वस्थ होते. रात्री दहा वाजता घरी परतणारे सासरे घरी न आल्याने आम्ही चौकशी केली. त्यावेळी ते प्रवासी भाडे घेऊन बाहेर गेले असतील असा विचार केला. आकाश म्हात्रे यांच्या तावडीतून सुटका झाल्यावर मुंजाजी शेळके पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घरी आले.

त्यांनी घरात प्रवेश केल्यावर मोठागावमध्ये घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. ते ऐकून कुटुंबीय झोपी गेले. दरम्यानच्या काळात आकाश म्हात्रे यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दहा हजार रूपये द्यायचे कोठुन या विचाराने चिंताग्रस्त असलेल्या मुंजाजी यांनी घरात कुटुंबीय झोपी गेले आहे हे पाहून स्वयंपाक घरातील खोलीत जाऊन घराच्या छताच्या वाशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तक्रारदार ज्योती शेळके उठल्या तेव्हा त्यांना स्वयंपाक घरात सासरे मुंजाजी यांनी गळफास घेतला असल्याचे दिसले. त्या घाबरल्या. शेजाऱ्यांना बोलविले. मुंजाजी यांना तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश म्हात्रे यांच्या वाहनाला मुंजाजी यांच्या रिक्षेचा धक्का लागला. वाहनाची खराबी झाली म्हणून आकाश यांनी मुंजाजी यांच्याकडे दहा हजार रूपये भरपाई मागितली. त्यांची रिक्षा स्वताच्या ताब्यात ठेवली. यामुळे मानसिक ताण येऊन मुंजाजी यांनी आत्महत्या केली, असे ज्योती शेळके यांनी तक्रारीत म्हटले आहे.