डोंबिवली – चतुरंग प्रतिष्ठानतर्फे डोंबिवलीत शनिवारी (ता. २६) चैत्रपालवी संगीतोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चतुरंग संगीत सन्मान आणि चुतरंग शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम होणार होता. परंतु, पहलगाम येथील बेसरन पठारावर दहशतवाद्यांनी हिंदु पर्यटकांची अतिशय क्रूर पध्दतीने गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा समावेश होता. या भ्याड हल्ल्याचा निषेध आणि पीडित कुटुंबीयांच्या दुखात सहभागी होण्यासाठी शनिवारी (ता.२६) रोजी होणारा चैत्रपालवी संगीतोत्सवाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे चतुरंग प्रतिष्ठानच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नीलिमा भागवत यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चैत्रपालवी संगीतोत्सवाचा कार्यक्रम तुर्तास स्थगित करण्यात आला असला तरी, हा कार्यक्रम जेव्हा निश्चित केला जाईल. त्यावेळी रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमाची स्थळ, वेळेप्रमाणे आगाऊ माहिती दिली जाईल, असे भागवत यांनी पत्रकात म्हटले आहे. पहलगाम येथील बेसरन पठरावरील हल्ल्यात हिंदु म्हणून दहशतवाद्यांनी डोंबिवली पश्चिमेतील अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या पर्यटकांच्या त्यांच्या पत्नी, मुलांसमोर क्रूरपणे गोळ्या झाडून हत्या केली. अत्यंत अमानुषपणे करण्यात आलेल्या या धर्मांध हल्ल्याने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. या तिन्ही डोंबिवलीकर पर्यटकांच्या मृत्युने प्रत्येक डोंबिवलीकर हादरुन गेला आहे. आपल्या कुटु्ंबातील एक सदस्य गेल्याची शहरवासियांची भावना आहे.
या तिन्ही निष्पाप पर्यटकांचे आपल्यातून कायमचे अचानक निघून जाणे ही डोंबिवलीकरांसाठी शब्दातीत हानी आहे. अशा शोकाकुल, मन हेलावुन टाकणाऱ्या परिस्थितीत शहरात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम करणे, स्वीकारणे हे कोणाही डोंबिवलीकरांच्या मानसिकतेत बसणारे नाही. हाच विचार करून चतुरंग प्रतिष्ठानने शनिवारी डोंबिवलीत होणारा चैत्रपालवी संगीतोत्सव कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कार्यकर्त्या नीलिमा भागवत यांनी म्हटले आहे.
शनिवारच्या कार्यक्रमात गायक अद्वैत केसकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार होता. त्यांना निषाद चिंचोले, निनाद जोशी वाद्याची साथ देणार होते. ‘आशाताई-एक सूरदासी’ या गायन मैफलीत वेदश्री खाडिलकर-ओक गायन करणार होत्या. त्यांना आदित्य ओक, प्रसाद पाध्ये वाद्याची साथ देणार होते. या कार्यक्रमात म्हैसकर फाऊंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार डाॅ. पंडित विद्याधर व्यास यांना, अद्वैत केसकर यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार होती. हा पुरस्कार पंडित अरूण कशाळकर, पंडित चंद्रशेखर वझे, प्रवीण करकरे, शुभदा पावगी यांच्या उपस्थितीत देण्यात येणार होता. डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात संध्याकाळी साडे चार वाजता हा कार्यक्रम होणार होता.