डोंबिवली – कल्याण जवळील आंबिवली येथे एका महिलेचा मोबाईल व्हाॅटसपच्या माध्यमातून कागदपत्रे मागविण्यासाठी एका १८ वर्षाच्या तरूणाने गुरूवारी दुपारी हिसकावून घेतला. त्यानंतर कागदपत्रे मागविण्याचा बहाणा करून महिलेच्या समोरून संबंधित तरूणाने मोबाईल घेऊन पळ काढला. काही जागरूक नागरिकांनी या तरूणाचा पाठलाग करून त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
सत्यभामा अच्छेलाल जैसवाल (५०) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या कल्याण जवळील टाटा पाॅवर येथील आंबिवली येथील सर्व सेवा केंद्र मोहने बाजारपेठ भागात राहतात. मोहने बाजारपेठेतील मनपसंद दुकानाच्या समोर हा चोरीचा प्रकार दिवसाढवळ्या गुरूवारी घडला आहे.
तक्रारदार सत्यभामा जैसवाल यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण आपल्या कामासाठी मोहने बाजारपेठेमधील मनपसंद दुकानाजवळील सर्व सेवा केंद्रात आले होते. यावेळी उल्फान हाकिमदिन मोहम्मद (१८) हा त्याचवेळी दुकानात आला. तो आपणास मोहने बाजारपेठ भागात गाळा भाड्याने घ्यायचा आहे, असे बोलू लागला. तो मुळचा उत्तरप्रदेशातील रहिवासी आहे. आणि तो कामधंदा नसलेला फिरस्ता आहे.
तक्रारदार सत्यभामा यांनी त्यांना गाळा भाड्याने देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यात व्यवहाराची बोलणी सुरू होती. उल्फान आपण गाळा भाड्याने तात्काळ घेणार आहोत, असे सत्यभामा यांना दाखवित होता. गाळा भाड्याने घ्यायचा असेल तर कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण करावा लागतील, असे तक्रारदार सत्यभामा जैसवाल उल्फान मोहम्मद याला सांगत होत्या. त्यावेळी तरूणाने आपण तात्काळ तुमच्याशी कागदपत्री व्यवहार पूर्ण करतो, असे सांगून मी माझ्या गावाहून माझे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे तात्काळ मागून घेतो असे बोलू लागला.
यासाठी ही कागदपत्रे उत्तरप्रदेशातील गावाहून मागून घेण्यासाठी आपल्याजवळ मोबाईल नसल्याचे उल्फानने सत्यभामा यांना सांगितले. तू तुझ्या सवडीने कागदपत्रे मागवून घे. मग आपण गाळे भाड्याचा व्यवहार करू असे सत्यभामा बोलत असताना तरूणाने सत्यभामा यांच्या हातामधील मोबाईल कागदपत्रे मागविण्यासाठी हिसकावून घेतला. तरी सत्यभामा त्याला मोबाईल देण्यास तयार नव्हत्या. दरम्यानच्या काळात उल्फानने आपण गावाहून व्हाॅटसपच्या माध्यमातून कागदपत्रे मागवित आहोत असा बहाणा करून सत्यभामा या दुकानात दुसरीकडे वळताच उल्फानने त्यांचा मोबाईल घेऊन धूम ठोकली. आपला मोबाईल घेऊन उल्फान पळत आहे पाहून सत्यभामा यांनी त्याचा पाठलाग करत चोर चोर करत त्याच्यामागे धावत सुटल्या.
समोर चोरटा पळत आहे हे लक्षात आल्यावर पादचाऱ्यांनी सत्यभामा यांच्या इशाऱ्यावरून उल्फान याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्या पादचाऱ्यांना हुलकावणी, धक्काबुक्की करत उल्फान पळण्यासाठी प्रयत्न करत होता. उल्फानला पादचाऱ्यांनी पकडला. त्याला चोप दिला आणि त्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार सत्यभामा यांनी केली आहे. पोलिसांनी उल्फान विरुध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे. उल्फानने असे प्रकार यापूर्वी केले आहेत का. तो सराईत चोरटा आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.