डोंबिवली : डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये राहत असलेल्या एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याची इन्टर्नशिपच्या माध्यमातून इन्टर्नशिपच्या एका बनावट संकेत स्थळाच्या माध्यमातून एका भामट्याने १० लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. ८ जुलै ते १३ जुलै २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात मोहित किशोर येवले (१९) हा विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. तो नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती महाविद्यालयात अभियाांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेत असताना आपण इन्टर्नशिप (आंतरवासिता) करावी म्हणून यासंदर्भातील गुगल सर्चच्या माध्यमातून काही संकेतस्थळ त्याने तपासली. त्यावेळी त्याला इन्टर्नशिपचे एक संकेतस्थळ आढळले. सदर संकेतस्थळावरील माहिती वाचल्यानंतर तक्रारदार मोहित याला संबंधित संकेतस्थळावरील माहिती भरण्यास सांगण्यात आले.
ही माहिती भरल्यानंतर मोहितच्या व्हाॅटसप क्रमांकावर इन्टर्नशिपची माहिती देणारी एक पुस्तिका आली. त्यात आवश्यक माहिती होती. त्यामुळे हे अधिकृत संकेतस्थळ आहे याची मोहितला खात्री पटली. त्याला इन्टर्नशिपसाठी दोन लाख नऊ हजाराचे ऑनलाईन माध्यमातून शुल्क भरण्यास सांगितले. भामट्याने दिलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर तक्रारदार मोहितने रक्कम भरणा केली. त्यानंतर भामट्याने मोहितचा व्हाॅट्सप क्रमांक ब्लाॅक करून त्याला टेलिग्रामद्वारे दोन लाख ३० हजार रूपये भरणा करण्यास सांगितले.
त्याशिवाय तुमची रक्कम परत मिळणार नाही असे सांगितले. ही रक्कम भरणा केल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोर खूप कमी आहे. तुम्हाला तुमची भरलेले शुल्क परत मिळण्यासाठी चार लाख ४० हजार रूपये भरणा करावे लागतील. भरणा केलेले पैसे परत मिळवायचे असतील तर वाढीव पाच लाख भरणा करण्याची मागणी भामटा करू लागला. पैसे भरणा केल्यानंतर मोहितकडून भामटा पुन्हा पैशाची मागणी करत होता.
मोहितने आपल्या नातेवाईकांकडून पैसे परत मिळतील या अपेक्षेने पैसे उसने घेऊन भरणा केले. जवळील पैसे संपल्यानंतर पुन्हा पाच लाख भरण्याची मागणी करण्यात आली. वाढीव पाच लाख रूपये कोठुन द्यायचे असा प्रश्न मोहितला पडला. मोहितचे वडील अंबरनाथ भागात तारतंत्री म्हणून काम करतात. एवढी रक्कम झटकन उभी करणे शक्य नाही. त्यामुळे मोहितने भरणा केलेली रक्कम परत करण्यासाठी भामट्याकडे तगादा लावला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
मोहितला संशय आला. त्याने टेलिग्रामचा पत्ता तपासला. त्यावेळी त्याला तो पत्ता बनावट असल्याचे आढळले. म्हणजे इन्टर्नशिपच्या नावाने आपली भामट्याने फसवणूक केली असल्याची खात्री पटल्यावर मोहित येवलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.