कल्याण – डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील पंधरा वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक बेकायदा इमारती बांधणाऱ्या एका बलवान भूमाफिया विरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या अधीक्षकांनी दोन महिन्यापूर्वी बेकायदा इमारत प्रकरणी ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात अटक होऊ नये म्हणून हा बलवान भूमाफिया न्यायालयात जामीन मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाचा अतिशय काटेकोर आणि योग्यरितीने तपास होणे आवश्यक आहे, असे मत नोंदवत या भूमाफियाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

सर्व स्तरात वजन असलेल्या या भूमाफियाला विष्णुनगर पोलीस अटक करतात का, याकडे इमारत प्रकरणी फसवणूक झालेले रहिवासी आणि शहरातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. डोंबिवली शहर परिसरात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, बनावट कागदपत्रे, अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के मारून या भूमाफियाने शहरात बेकायदा इमारती मागील काही वर्षात उभारल्या. काही इमारती पालिकेच्या आरक्षित भूखंडावर आहेत. काही कुंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यावर आहेत. या माफियाची दत्तनगर भागातील इमारत पालिकेने यापूर्वी भुईसपाट केली आहे.

बेकायदा इमारती उभारून नागरिकांची घर खरेदीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या या भूमाफियावर कारवाई व्हावी म्हणून निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर मागील दोन वर्षापासून या माफियाच्या विरुध्द पालिका, पोलिसांकडे तक्रारी करत आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेच्या ह प्रभागाने गेल्या जूनमध्ये हा भूमाफिया आणि त्याच्या दोन साथीदारांंनी डोंंबिवली पश्चिमेत कोपर भागात सखारामनगर काॅम्पलेक्स भागात स्वामी समर्थ मठासमोर उभारलेल्या बेकायदा इमारत प्रकरणी एमआरटीपीची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुूरू केला आहे.

या इमारती उभारताना पालिकेच्या बांधकाम परवानग्या घेण्यात आल्या नाहीत. पालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, शिक्के मारून परवानगीची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या माध्यमातून पालिकेचा महसूल बुडवून आणि रहिवाशांची बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीतून फसवणूक केली, अशी तक्रारी विष्णुनगर पोलीस ठाण्यात ह प्रभागाकडून दाखल आहे.

याप्रकरणात अटक होण्याच्या भीतीने बलवान भूमाफिया जामिनासाठी प्रयत्नशील आहे. या भूमाफियाच्या यापूर्वी दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. त्याला यापूर्वी अन्य गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. हे प्रकरण जुने आणि दिवाणी स्वरुपाचे आहे, असे युक्तीवाद भूमाफियाच्यातर्फे त्याची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात केले. विशेष सरकारी वकिलाने या भूमाफियाला जामीन देण्यास कडाडून विरोध केला. या भूमाफियावर बेकायदा इमारत प्रकरणी यापूर्वी गु्न्हे दाखल आहेत. या माफियाला जामीन दिला तर तो पुराव्यांमध्ये हेराफेरी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

न्यायालयाने भूमाफियाची पार्श्वभूमी विचारात घेऊन त्याला कोणतीही मुभा न देता त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. डोंबिवली शहरात दिवसभर अलिशान वाहनातून फिरणारा हा भूमाफिया मागील काही महिन्यांपासून शहरातून गायब असल्याची चर्चा आहे.