डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगरमधील वर्दळीच्या सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या वीस दिवसांपासून कोणतेही कारण न देता ठेकेदाराने श्री साई गणेश मित्र मंडळ प्रवेशव्दार भागात थांबिवले होते. या रखडलेल्या कामामुळे या भागात रस्ते मार्गात दीड फुटाचा उंचवटा तयार झाला होता. त्यामुळे प्रवाशांना या भागातून जाता येत नव्हते. वाहनांचा येथील मार्ग बंद झाला होता.
महाराष्ट्रनगर मधील दोन पाण्याच्या टाक्या ते महाराष्ट्रनगर रिक्षा वाहनतळ हा महत्वाचा वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने महाराष्ट्रनगर मधील प्रवाशांना गरीबाचापाडा, उमेशनगरमधून वळसा घेऊन रेल्वे स्थानक, घर, दुकान गाठावे लागत होते. या भागात सीमेंट काँक्रीट रस्ते काम सुरू असल्याने या बंद रस्त्याविषयी मागील दोन महिन्याच्या काळात नागरिकांनी ओरड केली नाही. महाराष्ट्रनगर रिक्षा वाहनतळ ते श्री साई गणेश मित्र मंडळ चाळ परिसरातील रस्ता ठेकेदाराने काँक्रीटने बांधून पूर्ण केला.
उर्वरित श्री साई गणेश मित्र मंडळाजवळ रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर तेथे रस्त्याला काँक्रीट रस्त्यामुळे दीड फुटाचा उंचवटा तयार झाला. दोन पाण्याच्या टाक्या ते श्री साई गणेश मंडळापर्यंतचा रस्ता डांबरी आणि खराब झाला आहे. त्यामुळे रिक्षा चालक श्री साई गणेश मित्र मंडळापर्यंत प्रवासी वाहतूक करत होते. उंचवट्यामुळे त्यांना महाराष्ट्रनगर रिक्षा वाहनतळाकडे रिक्षा नेता येत नव्हती. महाराष्ट्रनगर परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना रिक्षा पकडण्यासाठी दोन पाण्याच्या टाक्या, गोपीनाथ चौक भागात येऊन रेल्वे स्थानकाकडे रिक्षेने जावे लागत होते. गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील प्रवासी हा त्रास सहन करत होते.
श्री साई गणेश मित्र मंडळ भागातील रखडलेला उंचवट्याचा भाग ठेकेदाराने समतल करून या भागातून वाहतूक सुरू राहील अशी व्यवस्था करणे गरजेचे होते. गेल्या वीस दिवसांपासून ठेकदाराने या रखडलेल्या रस्ते कामाकडे लक्ष दिले नाही. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास निधीतील हे काम कल्याण पूर्वेतील एक वजनदार नगरसेवकाचा ठेकेदार करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. राजकीय पाठबळ असल्याने ठेकेदार नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नव्हता. या कामाचा निधी संपला अशी उत्तरे तो स्थानिकांना देत होता, असे स्थानिक नागरिक सांगतात.
रस्ते काम रखडल्याने नागरिक, वाहन चालक, रिक्षा चालक त्रस्त होते. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच खासदारांनी त्या ठेकेदाराची कानऊघडणी करून रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे ठेकेदाराने महाराष्ट्रनगर मधील रखडलेले काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. वजनदार माजी नगरसेवक पाठीशी असल्याने ठेकेदार कोणाला दाद देत नव्हता, असे स्थानिकांनी सांगितले.