डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर अरूणोदय सोसायटी भागात स्वामी विवेकानंद शाळेच्या समोरील भागात एका भाईने सर्व यंत्रणांना गुंडाळून महिनाभरापासून एक ढाबा सुरू केला आहे. संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत हा ढाबा सुरू असतो. खानपान, मद्य आणि वाद्यवृंदावर नृत्य असा धिंगाणा दररोज या नागरी वस्तीमधील ढाब्यात सुरू असल्याने अरूणोदय सोसायटी परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत.
या ढाब्याच्या भागात शाळा आहे. पालक, विद्यार्थी यांची या भागात सतत वर्दळ असते. रिक्षा वाहनतळ याठिकाणी आहे. सामान्य, मध्यवर्गियांची वस्ती या भागात आहे. डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर एका नामवंत शाळेच्या समोर हा ढाबा सुरू झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो. पोलिसांची गस्ती वाहने, दुचाकीवरील पोलिसांची या भागात सतत गस्त असेत. त्यांना हा ढाबा दिसत नाहीत का, असे प्रश्न परिसरातील रहिवासी, विद्यार्थी, पालक उपस्थित करत आहेत.
गेल्या वर्षी डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावर स्वामी विवेकानंद शाळा परिसरात कल्याणमधील चार पत्रकारांना महात्मा फुले रस्ता भागातील एका भाईने बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्या प्रकरणातील एका भाईला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी डोंबिवलीत येऊन महात्मा फुले रस्ता ते विष्णुनगर पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढत भरगच्च असा ‘प्रसाद’ दिला होता. यामुळे अरूणोदय, महात्मा फुले रस्ता भागातील रहिवासी समाधान व्यक्त करत होते.
आता या भाईने पुन्हा डोके वर काढले. त्याने पोलीस, महसूल, पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांना न जुमानता वर्दळीच्या रस्त्यावर ढाबा सुरू केला आहे. एका धोकादायक इमारतीच्या पाडलेल्या जागेत हा ढाबा सुरू करण्यात आला आहे. बाहेरून हिरवा आणि आतून काळ्या कपड्याने हा ढाबा आच्छादण्यात आला आहे. याठिकाणी खानपान, मद्य, नाचगाणी अशा धिंगाण्याची सोय आहे. तर्र झालेले हौशी याठिकाणी स्वता गाणी गात नाचत असतात. काही ढाब्यातील ध्वनीमुद्रिकेवरून वाजणाऱ्या गाण्याच्या तालावर नाचतात. रात्री दहा वाजल्यानंतर शांतता झाली की या धिंगाण्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होतो.
या ढाब्यामध्ये येणाऱ्या तरूणांच्या गाड्या स्वामी विवेकानंद शाळेसमोरील रस्त्यावर, बाजुच्या गल्लीत, गायकवाड वाडी रस्त्यावर उभ्या असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली वाहने या भागात उभी करणे अवघड झाले आहे. याविषयी उघडपणे बोलले तर वाद होईल या भीतीने कोणी रहिवासी बोलत नाही.
या ढाब्याच्या संदर्भात अरुणोदय सोसायटी भागातील रहिवाशांनी स्थानिक पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. पण त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, असे स्थानिक रहिवासी सांगतात. याप्रकरणात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.