डोंबिवली – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील कपड्यावर प्रक्रिया करणाऱ्या एरोसिल कंपनीला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आगीत जीवित हानी झाली नाही. मात्र वित्त हानी अधिक प्रमाणात झाली आहे. आग विझविण्याचे काम कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसीच्या चार अग्निशमन वाहनांच्या माध्यमातून करण्यात आले.
डोंबिवली एमआयडीसीत फेज एकमधील मानपाडा पोलीस ठाण्यामागील भागात एअरोसिल कंपनी आहे. या कंपनीत कपड्यावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. बुधवारी दुपारी अचानक कंपनीत आग लागली. सुरूवातीला आगीचे स्वरुप सौम्य होते, पण कपडा असलेल्या भागात आग पसरताच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच कंंपनीतील कर्मचारी, कामगार काही क्षणात कंपनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले. धोक्याचा इशारा या भागात देण्यात आला होता.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाला यासंदर्भातची माहिती मिळताच, अग्निशमन प्रमुख नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. परंतु, आजुबाजुला असलेल्या कंपन्यांना या आगाची झळ लागण्याची शक्यता विचारात घेऊन तेथेही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचे आवश्यक वाटल्याने जवानांनी आणखी चार अग्निशमन पथकांना घटनास्थळी दाखल होण्याचे कळविले.
चारही अग्निशमन पथके एरोसिल कंपनीच्या चारही बाजुने आगीवर उच्चदाबाने पाणी फवारा मारून आग विझविण्याचे काम करत होते. त्याच बरोबर आग जवळच्या कंपन्यांच्या भागात पसरणार नाही याची काळजी जवान घेत होते. मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग लागलेल्या कंपनीच्या दिशेने जाणारे रस्ते चारही बाजुने बंद केले. परिसरातील बघ्या नागरिकांची गर्दी हटवली. आग विझविताना मध्येच पावसाच्या सरी बरसत होत्या.
वारा नसल्याने जवानांना आग विझविण्याचे काम सोपे झाले होते. एकाच जागी उभे राहून अति उच्चदाबाने आगीवर पाण्याचा फवारा मारणे शक्य होते. या घटनेची माहिती मिळताच कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी आणि इतर पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी यंत्रणांची गरज आहे का याची माहिती घेतली. त्यावेळी चार अग्निशमन पथके आगीवर काबू मिळवतील असे सांगण्यात आले.
आग कशामुळे लागली हे अद्याप निश्चित समजू शकले नाही. परंतु, शॉर्टसर्किट किंवा कपड्यावर प्रक्रिया करताना काही तांत्रिक कारणामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आग विझविणाऱ्या यंत्रणांकडून देण्यात येत आहे. कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले.