डोंबिवली – डोंबिवलीत निळजे भागात एका सोळा वर्षाच्या मुलाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून गेल्या महिन्यात एका वृध्दाला जोराची धडक दिली होती. या वृध्दाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा त्यात मृत्यू झाला. या अपघाताला अल्पवयीन दुचाकी स्वारासह त्याला आपल्या मालकीची दुचाकी चालविण्यास देणारा दुचाकी मालक जबाबदार असल्याने वृध्दाच्या मुलाने अल्पवयीन मुलगा आणि वाहन मालका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

तक्रारदार संतोष शिरपूरकर हे रिक्षा चालक आहेत. ते निळजे येथील लोढा हेवन भागात राहतात. शिरपूरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोढा हेवन चंद्रेश निळकंठ सोसायटी परिसरात राहणारा अल्पवयीन मुलगा, आणि या दुचाकीचा मालक हनुमंता आर. गुप्ता यांच्या विरुध्द मोटार वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात निळजे रेल्वे स्थानक रस्त्यावर रमजान चिकन सेंटरसमोर गेल्या महिन्यात झाला होता.

संतोष शिरपूरकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपले वडील गेल्या महिन्यात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पायी बाजारपेठेच्या दिशेने चालले होते. ते रस्त्याच्या कडेने जात असताना त्यांना भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या सोळा वर्षाच्या अल्पवयीन दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली. अचानक दुचाकीची धडक बसल्याने वृध्द वडील जमिनीवर कोसळले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करण्या ऐवजी अल्पवयीन मुलगा कोणाला काहीही न सांगता तेथून पळून गेला. काही वेळाने संतोष शिरपूरकर यांना आपले वडील निळजे रेल्वे स्थानक मार्गावर जखमी होऊन पडलेत, अशी माहिती मिळाली.

ते तातडीने घटनास्थळी गेले. वडिलांना रुग्णालयात नेऊन उपचार केले. त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने नंतर त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेची माहिती काढल्यावर हा अपघात लोढा हेवनमधील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला असल्याचे समोर आले. मुलगा अल्पवयीन होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता.

अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्यास त्याच्या पालकाला दंंडाची शिक्षा आहे. हे माहिती असुनही दुचाकी स्वार मालक हनुमंता गुप्ता यांनी अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास दिले. त्यामुळे अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे दुचाकी चालवून आपल्या वडिलांना जोराची धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून तक्रारदार संतोष शिरपूरकर यांनी दुचाकी स्वार मालक हनुमंता आणि अल्पवयीन मुला विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत ढोले तपास करत आहेत.