डोंबिवली – दिवाळी सण संपताच सुट्टीचे दिवस असुनही शनिवार आणि रविवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील फ आणि ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी फेरीवाला आणि तोडकाम पथक घेऊन डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटरच्या आतील आणि परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले. दुकानांसमोरील लोखंडी पायऱ्या, अडथळे, निवारे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.

शनिवार, रविवार पालिका कार्यालयाला सुट्टी असल्याने आपण आता मस्त रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करू, अशा थाटात फेरीवाल्यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात आपली दुकाने, टपऱ्या, मंच थाटले होते. पथाऱ्या टाकून जागा अडवून व्यवसाय सुरू केले होते. फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, ग प्रभागाचे साहाय्यक भारत पवार यांनी दोन्ही प्रभागाची फेरीवाला हटाव आणि तोडकाम पथके एकत्र करून डोंबिवली पूर्व भागात शनिवारी, रविवारी सकाळी अचानकपणे कारवाई सुरू केली.

एकावेळी ३० ते ४० कामगार, जेसीबी रेल्वे स्थानक भागातील बाजारात कारवाई करू लागल्याने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. एकाही फेरीवाल्याला सामानासह पळून जाण्याची संधी न देता त्यांचे सामान पथकाने जप्त केले. दुकानदारांनी दुकानासमोर पावसाळी झड येऊ नये म्हणून निवारे उभारले होते. दुकानासमोर घट्ट लोखंडी पायऱ्या बनविल्या होत्या. यामुळे पादचाऱ्यांना चालणे शक्य होत नव्हते. अनेक फेरीवाल्यांनी सामान ठेवण्यासाठी झाड, विजेचे खांब यांच्या आडोशाने मंच, ठेले उभारले होते. दुकानदार आणि फेरीवाल्यांचे हे सर्व आधार तोडून टाकून साहाय्यक आयुक्त मुंबरकर आणि साहाय्यक आयुक्त पवार यांनी फेरीवाल्यांचे कणे मोडून काढले.

या कारवाईतून फुगे विक्रेतेही सुटले नाहीत. यापूर्वी फ प्रभागात कारवाई केली की फेरीवाले रामनगर ग प्रभागात पळून जात होते. आता एकाचवेळी फ आणि ग प्रभागात कारवाई करण्यात आली. त्यामुळे फेरीवाल्यांची कोंडी झाली. एका नारळ विक्रेत्याने तोडलेले बांधकाम पुन्हा रात्रीतून उभारले ते पक्के बांधकाम पुन्हा तोडण्यात आले. फेरीवाल्यांच्या टपऱ्या, हातगाड्यांचा जागीच जेसीबीच्या साहाय्याने चुरा करण्यात आला. सिमेंटचे ओटले जेसीबाच्या साहाय्याने खरवडून काढण्यात आले.

या कारवाईच्या शहर विद्रुप करणारे, पालिकेच्या परवानग्या न घेता लावलेले ५० हून अधिक बेकायदा फलक हटविण्यात आले. ४० निवारे, १२ टपऱ्या, १० ओटले, ६ ठेले तोडण्यात आले. या कारवाईसाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला होता. कारवाई सुरू असताना कोणीही फेरीवाला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. बहुतांशी फेरीवाले मुंब्रा, भायखळा, मस्जिद बंदर, अंधेरी परिसरातील रहिवासी आहेत. ते व्यवसायानिमित्त डोंबिवली भागात राहतात.

दिवाळीनिमित्त नागरिकांना खरेदी करता यावी म्हणून कारवाईत थोडी लवचकिता ठेवली होती. आता दिवाळी संपल्याने रस्ते, पदपथ अडवून बसणारे फेरीवाले, दुकानापुढील दर्शनी भाग निवारे, लोखंडी जाळ्यांनी अडविणाऱ्या दुकानदार, फेरीवाल्यांवर सुट्टीच्या दोन दिवसात कारवाई केली. रेल्वे स्थानकापासून १५० मीटरचा आतील आणि परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला. -हेमा मुंबरकर साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग.