डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक मालमत्ता कर, पाणी देयक शुल्क डोंबिवली शहरातील करदात्यांकडून जमा होते. महावितरणचे वीज देयक शुल्क डोंबिवलीतून शंभर टक्के भरणा होते. असा विविध प्रकारचा कर, शुल्क डोंबिवली शहरातील नागरिक वेळच्या वेळी पालिका, शासन तिजोरीत भरणा करतात.
असे असताना डोंबिवली शहराला नेहमीच स्थानिक पालिका प्रशासन, शासनाकडून विकास कामे, नागरी समस्या मार्गी लावण्याच्या कामात सापत्न भावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे एकदाच होऊन जाऊ द्या…डोंबिवली शहराची शासनाने स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी आणि या शहराचे विकास, नागरी समस्यांचे दुखणे कायम स्वरुपी संपुष्टात आणावे, अशी मागणी करणारा फलक डोंबिवलीतील उपक्रमशील शाळा मानपाडा-उंबार्ली येथील विद्या निकेतन शाळेने आपल्या शालेय बसवर झळकवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जनमताचा विचार करून आणि डोंबिवली शहर परिसरात सुरू असलेल्या चर्चेचे प्रतिबिंब नेहमीच विद्यानिकेतन शाळेच्या फलकाच्या माध्यमातून जनतेसमोर, शासन अधिकारी, लोक प्रतिनिधींसमोर आणले जाते. मागील तीन ते चार वर्षापासून विद्यानिकेतन शाळा लोकांचा आवाज म्हणून या फलकाच्या माध्यमातून विविध विषयांवर समाजात जनजागृती मोहीम राबवित आहे.
या उपक्रमाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलक तो योग्य संदेश देणारा, बोध घेणारच असेल याची खात्री असल्याने कोणीही अधिकारी, जाणता, लोक प्रतिनिधी या फलकावरील मजकूरा विषयी कधी अवाक्षर काढत नाही. आदर्शवत पिढी घडवण्याचे काम विद्यानिकेतन शाळेच्या माध्यमातून सुरू आहे. विद्यार्थ्यांची घडण करत असताना फलकाच्या माध्यमातून सामाजिक जागृती शाळेकडून केली जात आहे.
डोंबिवली शहर परिसराची आणि नागरीकरण झालेल्या भागाचा विचार केला तर डोंबिवली शहराची आज घडीची लोकसंख्या सुमारे दहा लाख आहे. या दहा लाख लोकसंख्येच्या माध्यमातून स्थानिक पालिका, शासन यंत्रणांना विविध कर, शुल्क माध्यमातून कोट्यवधि रूपयांचा महसूल मिळतो.
एकटे डोंबिवली शहर महापालिका, शासन यंत्रणांना कोट्यवधीचा महसूल वर्षाला मिळवून देत असेल तर या शहराचा आज उकिरडा का झाला आहे. कोणी आणली आहे ही परिस्थिती. डोंबिवली शहरातून कराच्या माध्यमातून जमा होणारा महसूल डोंबिवली शहरातील रस्ते, भुयारी मार्ग, आवश्यक गरजेचे पूल, पादचारी पूल, उद्यान, बगीचे सुशोभिकरण, मुख्य, अंतर्गत पालिका विकास आराखड्यातील रस्ते रूंदीकरण, काँक्रिटीकरण करण्यासाठी वापरला तर साहित्यिक, सुशिक्षित आणि सांस्कृतिकतेचा टेंभा मिरवणारे डोंबिवली शहर देखणे आणि आदर्शवत होण्यास वेळ लागणार नाही.
डोंबिवली शहराची आताची ओकी बोकी, विद्रुप झालेली अवस्था पाहता शासनकर्त्यांनी या शहराला देखणे, सुशोभित, सुस्थितीत करण्यासाठी या शहराची स्वतंत्र महानगरपालिका करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकांनीही आता देवासारखे कमरेवर हात ठेवून ‘आहे माझा हरी, काम करून देईल फुकटावरी’ या विचारात न राहता आपल्या शहराची स्वतंत्र महानगरपालिका होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या फलकातून देण्यात आला आहे.
आपला कारभार आपल्याच गावात सुरू झाला तर कोंडीतून वाट काढत कल्याण गाठायला नको. आपला आयुक्त, अधिकारी आपल्याच गावात राहणार असल्याने डोंबिवली करांना नागरी समस्या सोडविण्यासाठी तंगड तोड करायची गरज लागणार नाही, असे फलकातून स्पष्ट केले आहे.