डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरात आगामी पालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या धामधुमीत कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील २७ गावांमधील देसलेपाडा भागातून चाकू, सुरा, पिस्तुल, खंजीर, तलवार असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देसलेपाडा भागातील एका व्यक्तीला अटक केली आहे.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली शहर परिसरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या शस्त्रसाठा प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोशन हिरानंद झा (३६) याला अटक केली आहे. तो डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा येथील न्यू गार्डियन शाळेजवळील गोकुळ धाम सोसायटीत राहतो.

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत दोन लाख १५ हजार रूपये आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम निळकंठ भोसले यांना मिळालेल्या माहितीवरून कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

डोंबिवली जवळील देसलेपाडा भागात एका व्यक्तीजवळ तलवार, पिस्तुल, खंजिर, चाकू, सुरा असा मोठा शस्त्रसाठा आहे आणि या शस्त्रसाठ्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे, अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा घटक तीनच्या पथकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना मिळाली होती.

भोसले यांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली. त्यानंतर त्यांना मिळालेली माहिती खरी असल्याचे समजले. ही खबर बाहेर पडण्यापूर्वीच हा शस्त्रसाठा जप्त करणे आवश्यक होते. त्यामुळे भोसले यांनी ही माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली. शिंदे यांनी तात्काळ विशेष पथक तयार केले. हा शस्त्रसाठा संबंधित व्यक्तीसह जप्त करण्याचे निर्देश दिले.

गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता हा शस्त्रसाठा असलेल्या व्यक्तीच्या देसलेपाडा येथील घरात छापा टाकण्याचे नियोजन कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले. ठरल्या वेळेत पथकाने देसलेपाडा येथील गोकुळधाम सोसायटीतील शस्त्रसाठा असलेल्या इमारतीत छापा मारला. संबंधित व्यक्तीला शस्त्रसाठ्यासह अटक केली.

या शस्त्रसाठ्यात पोलिसांनी सुमारे दोन लाख रूपये किमतीची तीन देशी बनावटीची पिस्तुले, जिवंत काडतुसे, ३२ सेंटीमीटर लांबीचा धारदार सुरा, २६ सेंमी लांबीचा खंजिर, २२ सेंमी लांबीचे चार चाकू, ८४ सेमी लांबीची धारदार तलवार यांचा समावेश आहे. हा साठा पाहून पोलीसह आवाक झाले.

ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ३ डिसेंबरपर्यंत विनापरवाना शस्त्र वापरण्यास मनाई आदेश आहे. या मनाई आदेशाचा सदर व्यक्तीने भंग केला आहे. तसेच, या बेकायदा शस्त्र साठ्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता होती. त्यामुळे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी हा शस्त्र साठा ताब्यात ठेवणाऱ्या रोशन झा याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. हा शस्त्रसाठा झा याने आणला कोठून, तो कोणाला विक्री करणार होता कि त्याचा काही दुरुपयोग करणार होता या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.