डोंबिवली : महसूल विभागाने कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातील वाळू माफियांविरूध्द जोरदार कारवाईची मोहीम उघडली आहे. कल्याण भागात महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांची दोन दिवसापूर्वी गंधारे भागातील ६० लाखाची सामग्री नष्ट केल्यानंतर डोंबिवली विभागाच्या महसूल विभागाने बुधवारी डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेतीबंदर भागात खाडी किनारी वाळू माफियांची १० लाखाची सामग्री नष्ट केली.

डोंबिवलीत मोठागाव रेतीबंदर खाडी किनारा भागात वाळू माफियांनी माणकोली उड्डाण पुलाच्या बाजुला रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून ते ढीग खाडी किनारच्या हौद, कुंड्यांमध्ये लपून ठेवले असल्याची गुप्त माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना मिळाली होती. तहसीलदार शेजाळ यांनी डोंबिवली विभागाचे मंडळ अधिकारी रवींंद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार यांना तातडीने मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी वाळू माफियांनी उपसलेला रेती उपसा, तेथील ढीग आणि उपसा सामग्रीवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मंडल अधिकारी जमदरे, ग्राम महसूल अधिकारी कासार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि पोलीस पथकाच्या साहाय्याने बुधवारी दुपारी मोठागाव खाडी किनारी धडक मारली. वाळू माफियांनी खाडी किनारच्या हौद, कुंड्यांमध्ये लपवून ठेवलेला वाळूचा साठा जेसीबीच्या यंत्राच्या साहाय्याने पुन्हा खाडीत ढकलून दिला. खाडी किनारचे दगड सिमेंटचे वाळू साठवण हौद, कुंड्या तोडून टाकण्यात आल्या. वाळू उपशाची सामग्री तोडमोड करून खाडीत ढकलून देण्यात आली.महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस दिवसा खाडीत वाळू उपसा करताना बोटीतून पाठलाग करतात या भीतीने वाळू तस्कर आता रात्रीच्या वेळेत वाळू उपसा करतात. वाळू तस्करांची वाळू उपशाची सामग्री तोडमोड करून, जाळून नष्ट करण्याची मोहीम महसूल अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरटा मार्ग

डोंंबिवली पश्चिमेत मोठागाव रेतीबंंदर खाडी किनारी वाळू उपसा केल्यानंतर रात्रीच्या वेळेत वाळू वाहू वाहने डोंबिवली शहरातून कोपर, ठाकुर्ली उड्डाण पूल मार्गे नेली तर जागोजागी गस्तीवरील पोलीस ती वाहने अडवून ठेवतात. गु्न्हे दाखल करतात. त्यामुळे वाळू माफियांनी चोरीचे वाळू भरलेले डम्पर डोंबिवली शहरातून नेण्यास लागू नयेत. यासाठी माणकोली उड्डाण पुलाच्या सुरुवातीला अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेला चौकोनी वरच्या भागाचा लोखंडी अडथळा सैल केला आहे. वाळू भरलेले अवजड वाहन माणकोली पुलावरून नेताना वाळू माफिया पुलाच्या सुरवातीचा लोखंडी अडथळा वर उचलतात. डम्पर माणकोली पुलावर गेला की तो लोखंडी अडथळा पुन्हा जैसे थे लोखंडी कमान खांबावर ठेवतात. पुलाच्या दोन्ही बाजुला ही युक्ती वाळू माफियांनी करू ठेवली आहे. ती बंद करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.